Corona Vaccination: एक डोस कोवॅक्सिन अन् दुसरा कोविशील्डचा दिला गेला तर..?; आरोग्य मंत्रालयानं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:08 PM2021-05-27T18:08:09+5:302021-05-27T18:11:57+5:30

Corona Vaccination: उत्तर प्रदेशात एका व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिल्याचा प्रकार

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. आता हाच आकडा २ लाखांच्या आसपास आला आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता लसीकरणात अडथळे येऊ लागले आहेत. लसीकरणाला वेग देण्याची गरज असताना अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण करायचं कसं असा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असल्यास लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र अनेक ठिकाणी लसींची टंचाई असल्यानं लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. त्यातच उत्तर प्रदेशात एका ठिकाणी एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस दिले गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

सध्या देशात सीरमनिर्मित कोविशील्ड, भारत बायोटेकनिर्मित कोवॅक्सिन लसींचा वापर होत आहे. तर काही ठिकाणी स्पुटनिक व्ही लसदेखील वापरली जात आहे. लसींच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यात आलं आहे.

काल उत्तर प्रदेशात एका ठिकाणी एका व्यक्तीला वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेले. ही बाब समोर येताच एकच खळबळ उडाली. लसीकरण केंद्रांवर चुकून घडलेल्या या प्रकारांबद्दल आरोग्य मंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं.

एका व्यक्तीला एकाच लसीचे दोन डोस देण्यात यायला हवे. प्रोटोकॉलमध्ये ही बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली असून तशा सूचना देण्यात आल्याचं नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

उत्तर प्रदेशात घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं पॉल यांनी सांगितलं. एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेले असल्यास चिंता करण्याचं कारण नाही, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लवकरच आणखी ४ कोरोना लसींना मंजुरी देण्यात येईल. सरकारचा परदेशी कंपन्यांशी संवाद सुरू आहे. मात्र मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाला आपलं प्राधान्य आहे, अशी माहिती पॉल यांनी दिली.