CoronaVirus Live Updates : बापरे! ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, 'या' ठिकाणी 69 विद्यार्थी-शिक्षक पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:54 PM2021-12-05T18:54:44+5:302021-12-05T19:22:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनची दहशत असताना आता तब्बल 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात रुग्ण आढळून आला आहे. ओमायक्रॉनची दहशत असताना राज्यात आता तब्बल 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

चिकमगलुरू (Chikkamagaluru) जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात 40 विद्यार्थी/शिक्षक कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचवेळी, शिवमोगा येथील एका शाळेतील 29 मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

शिवमोगा उपायुक्त केबी शिवकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी नर्सिंग स्कूलमध्ये 29 मुलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. रँडम सँपलिंगमध्ये ही मुले पॉझिटिव्ह आढळली असून यातील बहुतांश मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत.

उपायुक्तांनी वृत्तसंस्थेला मुलांचे रँडम सँपल घेण्यात येत आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं असं म्हटलं आहे. शिवकुमार यांनी ही मुले वेगवेगळ्या राज्यातून या खासगी नर्सिंग स्कूलमध्ये आली आहेत. आम्ही वसतिगृहाचा परिसर सील केला आहे. 29 विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे असं म्हटलं आहे.

या घटनेनंतर परिसरात राहणाऱ्या लोकांचे नमुनेही घेण्यात आले असून तपास सुरू असल्याचं उपायुक्तांनी सांगितले. याआधी कोरोनाची झपाट्याने वाढ होत असलेली प्रकरणे पाहता राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत.

शाळा-महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर सरकारने पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला कर्नाटकमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची दोन प्रकरणे देखील आढळून आली होती.

भारतात आतापर्यंत चार ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 8,895 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशातील एकूण बाधितांची संख्या 3,46,33,255 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4,73,326 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ओमायक्रॉनचा धोका पाहता देशात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागणार का? असं विचारले असता त्यावर केंद्राने उत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी लॉकडाऊनबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिले.

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊन लावले जाणार का, असे विचारले असता लॉकडाऊन लावण्याची आत्ताच गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासोबत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता अधिक सतर्क होण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचे जे आव्हान आहे त्याचा आपण मुकाबला करणार आहोत. आपल्याकडे त्यासाठी सक्षम अशी यंत्रणा आहे. आपली आरोग्य यंत्रणाही सक्षम आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. या लढाईत लोकांचे सहकार्य सर्वात महत्त्वाचे आहे.

कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. प्रामुख्याने मास्कचा वापर सक्तीने केला गेला पाहिजे, असं पॉल यांनी नमूद केले. बूस्टर डोसबाबतही त्यांनी महत्त्वाचे भाष्य केलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सर्वच देश सध्या अभ्यास करत आहेत.