उद्धव ठाकरे ज्या कारणावरून झाले होते 'टार्गेट', तेच तेजस्वी यादवांबाबत घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 07:37 PM2022-08-19T19:37:41+5:302022-08-19T19:43:16+5:30

बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झाल्यापासून हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता नितीश कुमार मंत्रिमंडळात समावेश असलेल्या आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या मुलांबाबत वाद निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात विरोधकांकडून टार्गेट झाले तेच तेजस्वी यादवांसोबत घडत आहे.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे खास संजय यादव हे कोणतेही सरकारी पद नसताना आरोग्य विभागाच्या अधिकृत बैठकीत हजर झाले. यापूर्वी त्यांचे मेहुणे शैलेश कुमार हे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांच्यासोबत विभागीय बैठकीत दिसले होते. तेव्हापासून बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.

विशेषत: तेजस्वीच्या निमित्ताने भाजपाने थेट नितीशकुमारांवर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी आरोग्य खात्याचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत संजय यादवही बसले.

संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार आहेत. त्यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नसले तरी विभागीय बैठकीत फक्त मंत्री आणि अधिकाऱ्यांनाच बसू दिले जात असताना ते बसले, हे विशेष. शुक्रवारी राज्यसभा खासदार आणि बिहार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी एक फोटो शेअर करत टीका केली.

सुशील मोदींनी ट्विट करून लिहिले की, तेजस्वीच्या शेजारी बसलेला हा संजय यादव कोण आहे? मोठा मुलगा जावई आणि धाकट्या मुलगा सल्लागार (अशासकीय) बसवून आरोग्य विभागाचा आढावा घेतोय? कुठल्याही IAS ची हिंमत नव्हती का हे थांबवण्याची असा सवाल त्यांनी विचारला.

मूळचे हरियाणाचे असलेले संजय यादव हे तेजस्वी यादव यांच्याशी अनेक वर्षांपासून राजकीय सल्लागार म्हणून जोडले गेले आहेत. संजय यादव हे केवळ राजकीय सल्लागार नसून ते तेजस्वी यादव यांचे नातेवाईकही असल्याचे बोलले जात आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीच्या निवडणूक प्रचाराची धुरा पूर्णपणे संजय यादव यांच्या हातात होती, त्यामुळे आरजेडी बिहारमध्ये नंबर वन पक्ष म्हणून उदयास आला.

सुमारे वर्षभरापूर्वी तेज प्रताप यादव यांनी संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेजस्वीच्या निकटवर्तीय संजय यादवकडून आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तेज प्रताप यांनी सांगितले होते की, संजय यादव यांनी त्यांच्या तीन अंगरक्षकांचे मोबाईलही बंद केले होते.

१९ ऑगस्ट २०२१ रोजी तेज प्रताप यांनी ट्विट केले होते की, ज्या स्थलांतरित सल्लागाराच्या इशाऱ्यावर पक्ष चालतो, तो आपल्या कुटुंबातील कोणालाही हरियाणात सरपंच बनवू शकत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. तो माझ्या अर्जुनला मुख्यमंत्री बनवतो. तो स्थलांतरित सल्लागार लालू कुटुंब आणि राजद यांच्यात मतभेद निर्माण करू शकतो असा आरोप तेज प्रताप यादव यांनी केला होता.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक शासकीय बैठकीत एक चेहरा प्रामुख्याने दिसत होता. तो म्हणजे आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ वरुण सरदेसाई यांचे. वरूण सरदेसाई यांच्या शासकीय बैठकीतल्या उपस्थितीवरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.