Constitution Day: म्हणून या ठिकाणी हेलियमच्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:36 PM2021-11-26T16:36:09+5:302021-11-26T16:48:39+5:30

Constitution Day, Indian Constitution original copy: आज २६ डिसेंबर राज्यघटना दिन. आजच्या दिवशीच घटना समितीने देशासाठी लिहिलेली घटना स्वीकारण्यात आली होती. हस्तलिखित असलेली भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत २६ डिसेंबर १९४९ रोजी हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्वीकारले होते.

आज २६ डिसेंबर राज्यघटना दिन. आजच्या दिवशीच घटना समितीने देशासाठी लिहिलेली घटना स्वीकारण्यात आली होती. हस्तलिखित असलेली भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत २६ डिसेंबर १९४९ रोजी हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्वीकारले होते. आज ७२ वर्षांनंतरही घटनेची ही मूळ प्रत सुरक्षित आहे. तसेच ती नेहमी सुरक्षित राहावी यासाठी ही प्रत संसदेच्या ग्रंथालयामध्ये हेलियम गॅसने भरलेल्या एका चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.

एकेकाळी भारतीय राज्यघटनेची ही मूळ प्रत फलालेनच्या कपड्यांमध्ये गुंडाळून नेफ्थालिनच्या गोळ्यांसोबत ठेवण्यात आले होते. १९९४ मध्ये अमेरिकेप्रमाणेच भारत सरकारनेसुद्धा ही प्रत शास्त्रीय प्रयोगाने तयार केलेल्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आले पाहिजे असे ठरवले. त्यासाठी सरकारने अमेरिकेच्या गॅटी इन्स्टिट्युटशी करार केला. त्यानंतर भारताची नॅशनल फिजिकल लायब्ररी आणि गॅटीने मिळून संयुक्तपणे भारतीय घटनेच्या कॉपीसाठी एक विशिष्ट्य पद्धतीचे गॅस चेंबर तयार केले.

मात्र घटनेची प्रत ठेवण्यासाठी गॅस चेंबरचीच निवड का करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आता कसे आहे की, हेलियम हा एक निष्क्रिय वायू आहे. त्यामुळे त्यामध्ये ठेवण्यात येणाऱ्या वस्तू ह्या दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहू शकतात. हा वायू कुठलीही क्रिया करत नाही. तसेच अन्य कुठल्या तत्त्वांना क्रिया करू देत नाही. अन्यथा नैसर्गिकपणे प्रत्येक पदार्थावर कार्बनिक किंवा अकार्बनिक प्रक्रिया होते. तसेच वेळेनुसार त्याचे विधटन होण्यास सुरुवात होते. मात्र हेलियमसोबत घटनेची मूळ प्रत सुरक्षित ठेवण्यासाठी अजून काही प्रक्रिया केली जाते.

भारतीय राज्यघटना काळ्या शाईने लिहिली आहे. या शाईचे ऑक्सिकरण होते. म्हणजेच कालौघात लिहिण्यासाठी वापरण्यात आलेल्या शाईचा रंग फिकट पडायला सुरुवात होते. त्यामुळे घटनेच्या कॉपीसाठी ५० ग्रॅम आर्द्रता प्रति क्युबिक मीटरची गरज असते. त्यासाठी एअर टाईट चेंबरला अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की, त्यामध्ये एका निश्चित मात्रेमध्ये आर्द्रता कायम राहते.

घटनेच्या या मूळ प्रतीमध्ये घटनेच्या प्रत्येक सदस्याची सही आहे. राज्यघटना ठेवण्यात आलेल्या गॅस चेंबरमधील गॅस हा दरवर्षी काढला जातो. तसेच नव्याने त्यामध्ये गॅस भरला जातो. या चेंबरची दर दोन महिन्यांनी तपासणी होते. तसेच त्याच्या आतील परिस्थितीवर सीसीटीव्हीच्या माध्यवातून लक्ष ठेवले जाते.

ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. घटनेचे हस्तलेखन प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले होते. घटना इटालिक स्टाईलमध्ये सुंदर कॅलियोग्राफीक पद्धतीने लिहिण्यात आली आहे. त्यानंतर देहराडूनमधील सर्व्हे ऑफ इंडियाने ती छापली. घटनेच्या मूळ प्रतीमध्ये सुंदर डिझाईन आणि चित्रं आहेत. ही चित्रे शांतिनिकेतनचे चित्रकार नंदलाल बोस आणि राममनोहर सिन्हा यांनी काढली होती.