चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:25 IST2025-08-07T16:18:13+5:302025-08-07T16:25:09+5:30

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीतील मतदार यादीचा घोटाळा समोर आणत भाजपावर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या निकालानंतर काँग्रेसने मतदानावर शंका उपस्थित केली होती. ५ वर्षाच्या तुलनेत अवघ्या ५ महिन्यात नवे मतदार यादीत जोडले गेले असा आरोप त्यांनी केला.

विशेष म्हणजे यात वयस्क मतदारांची संख्या राज्यातील लोकसंख्येपेक्षाही अधिक दाखवली आहे. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाला ४ पत्रे लिहिली. शिवाय त्यांच्याकडून मतदार यादीही मागवली असं राहुल यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने या प्रकारावर टोलवाटोलवी केली आणि पुरावे नष्ट करण्यात आले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी देण्यास नकार दिला. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेज मर्यादित कालावधी करता ठेवण्यासाठी कायदा बदलला. नेमकं निवडणूक आयोगाला काय लपवायचे आहे असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाच्या या प्रकारानंतर काँग्रेसनं स्वत: तपास सुरू केला. त्यात सर्व्हेत १६ लोकसभेच्या जागा काँग्रेसला दाखवल्या असताना प्रत्यक्षात तिथे ९ जागा मिळाल्या. आम्ही ७ पराभूत उमेदवारांच्या हरण्याची कारणे शोधली. त्यात १ मतदारसंघ तपासला तो बंगळुरू सेंट्रल..या लोकसभा मतदारसंघातील केवळ महादेवापुरा या मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असं राहुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या मतदार यादीत लाखो नोंदणी एक एक करून पडताळावी लागत होती. OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन शक्य नाही कारण निवडणूक आयोगाने जाणुनबुजून अशी कागदे देते जे कॉम्प्युटरने वाचली जाऊ शकत नाही असं राहुल यांनी म्हटलं.

जेव्हा ही यादी पडताळणी केली त्यात अनेक दुबार मतदार सापडले. त्यात एक मतदार, विविध राज्यांमध्ये मतदान केल्याचे दिसून आले. आदित्य श्रीवास्तव असं एका मतदाराचे उदाहरण राहुल गांधी यांनी दिले. हा एकच चेहरा असलेला मतदार, मतदान क्रमांकही एकच परंतु ४ ठिकाणी मतदान करत असल्याचे दिसून आले.

FPP6437040 हा मतदान क्रमांक असलेला आदित्य श्रीवास्तव ज्याचे महाराष्ट्रातील मुंबई उपनगरात असलेल्या जोगेश्वरी पूर्व येथे मतदान दाखवण्यात आले. तोच उमेदवार कर्नाटकच्या बंगळुरू शहरातील महादेवापुरा इथला मतदार असल्याचे दिसला. हाच आदित्य श्रीवास्तव उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही मतदार आहे. १६ मार्च २०२५ च्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार त्याचा आयडीचा स्क्रिनशॉट्स घेण्यात आला.

हाच आदित्य श्रीवास्तव कर्नाटकातील महादेवापुरा येथे २ वेळा मत देतो. तो महाराष्ट्रातील निवडणुकीत मुंबईत मतदान करतो आणि उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही तो मतदार म्हणून आढळून येतो. राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत याचा पुरावा देत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उभे केले.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पुराव्यासह आणखी एक दावा केला, त्यात एकाच पत्त्यावर अनेक मतदार राहत असल्याचे सांगत असे १० हजार ४५२ मतदार असल्याचे म्हटले. त्यातील उदाहरण म्हणून त्यांनी घर क्रमांक ३५ मध्ये ८० मतदार, घर क्रमांक ७९१ येथे ४७ मतदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या मतदारांचे पत्ते सारखेच होते असं त्यांनी म्हटलं.

याच मतदार यादीत जवळपास ४ हजार १३२ मतदार असे होते, ज्यांचे फोटो कुणालाही दिसत नाहीत. हे फोटो अस्पष्ट किंवा इतके छोटे होते की त्यांना कुणीच ओळखणार नाही. राहुल गांधी यांनी त्या यादीचा काही भाग पत्रकारांसमोर आणून निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले.