लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 05:38 PM2020-05-26T17:38:05+5:302020-05-26T17:56:13+5:30

चकमकीच्या वेळी चीनच्या सैनिकांनी पँगाँग त्सो तलावाजवळील भागात भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी दगड आणि काटेरी तारांचे आच्छादन असलेल्या दंडुक्यांचा वापर केला होता.

लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्य सीमेवर पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पँगाँग त्सो तलावाजवळ नुकत्याच झालेल्या चकमकीदरम्यान 'अनैतिक पद्धतींचा' अवलंब करत चिनी सैनिकांनी भारतीय सुरक्षा दलांवर दगडफेक केली आहे.

चकमकीच्या वेळी चीनच्या सैनिकांनी पँगाँग त्सो तलावाजवळील भागात भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी दगड आणि काटेरी तारांचे आच्छादन असलेल्या दंडुक्यांचा वापर केला होता.

चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना दुखापत व्हावी या हेतूने हे कृत्य केले होते, परंतु भारतीय बाजूनेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भारतीय जवानांपेक्षा चिनी सैनिकांची संख्या जास्त होती. तरीही भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना चांगलंच मार्गावर आणलं आहे.

चीनने मोठ्या प्रमाणात सीमेवर सैन्य वापरण्याची आपली जुनी रणनीती पुन्हा कार्यान्वित केली आहे. दोन्ही सैनिकांमधला हा संघर्ष बराच काळ चालू राहिला. परंतु यातून पीपल्स लिबरेशन आर्मीचा अनैतिक आणि भयंकर चेहरा समोर आला.

चिनी सैन्याप्रमाणे भारतीय जवान चिनी सैनिकांना आपल्या हद्दीतून काढून टाकण्यासाठी कुठलेही डावपेच वापरत नाहीत. केवळ क्वचित प्रसंगीच भारतीय जवान चीनच्या सैनिकांना भिडतात.

एकमेकांच्या हद्दीतून बाहेर काढण्यासाठी सैनिक एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत.

सद्य परिस्थितीत 5,000हून अधिक चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आले आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सामना 5-6 मेच्या दरम्यान सुरू झाला आणि अशी स्थिती सिक्कीमपर्यंत निर्माण झाली आहे.

भारतीय हवाई दलानं आपल्या वजनदार विमानांचा वापर उंचावरील क्षेत्रातील सैनिकांना पूर्व लडाखच्या सेक्टरमध्ये आणून तैनात करण्यासाठी केला आहे.

दौलत बेग ओल्डी सेक्टरमधील हवाई पट्टीचा वापर करून या भागात सैन्य जमा केले गेले. यासाठी हेलिकॉप्टर व इतर माध्यमांचा सहारा घेण्यात आला आहे.