फक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 06:21 PM2021-01-24T18:21:09+5:302021-01-24T18:37:02+5:30

नवी दिल्ली : देशात फक्त सहा दिवसांत दहा लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. देशातील कोरोना लसीकरणाच्या या आकड्याने अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनाही मागे टाकले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून सुमारे 16 लाख लोकांना लसी देण्यात आली आहेत. तसेच, कोरोना लसीकरणाचा दहा लाखांचा टप्पा पार करण्यासाठी ब्रिटनला 18 दिवसांचा कालावधी लागला होता, तर अमेरिकेला 10 दिवस लागले होते.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, 24 जानेवारीला सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास 16 लाख (15,82,201) लाभार्थ्यांना लसी देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरातील 3,512 सत्रांमध्ये सुमारे दोन लाख (1,91,609) लोकांना लसी देण्यात आली आहे.

याचबरोबर, आतापर्यंत लसीकरणासाठी 27,920 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, देशात कोरोनावरील उपचाराची रणनीती यशस्वी झाली असून सध्या कोरोना संसर्गावर उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात सध्या 1,84,408 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, जे एकूण रुग्णांच्या 1.73 टक्के आहेत. गेल्या 24 तासांत 15,948 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत या कालावधीत 1,254 रुग्णांची कमी झाली.

देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांपैकी 75% रुग्ण केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. केरळमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 5,283 निरोगी रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात 3,694 रुग्ण बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 1,03,16,786 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी 84.30 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक 6960 नवीन प्रकरणे आढळली आहेत. यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचे 2697 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 14,849 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर संक्रमित रुग्णांची संख्या 1,06,54,533 वर पोहोचली. यामध्ये 80.67 टक्के रुग्ण हे सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 9 कोटींवर गेला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत ही कोरोना लस दिली जात आहे.

याचबरोबर, भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये स्टील उत्पादक श्रेत्रातील जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.