Delhi's Burari Death Case : वाचा एकाच कुटुंबातील ११ जणांच्या आत्महत्येबाबतच्या ११ धक्कादायक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 06:29 PM2018-07-04T18:29:41+5:302018-07-04T18:44:27+5:30

दिल्लीत बुरारी परिसरातील भाटिया कुटुंबातील ११ जणांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येने अवघ्या देशात खळबळ माजलीये. या धक्कादायक घटनेमागे नेमके काय कारण असेल याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दिल्ली पोलीस याबाबत अधिक चौकशी व तपास करत असताना अनेक धक्कादायक बाबी त्यांच्या लक्षात येत आहेत. त्यापैकी या ११ गोष्टी नक्की जाणून घेण्यासारख्या आहेत.

१) या घटनेबाबत गुन्हे शाखेने या कुटुंबातील २० जणांची चौकशी केली. मात्र त्यापैकी कुणालाचा या गूढ मृत्यूंबाबत काहीच माहिती देता आली नाही. मात्र पोलिसांना असा संशय आहे की, यामागे काहीतरी अंधश्रद्धा किंवा स्वयंघोषित धर्मगुरूचा हात असू शकतो.

२) एका डिलीव्हरी बॉयने या कुटुंबाला शेवटचं पाहिलं होतं. आदल्या रात्री तो मुलगा भाटियाच्या घरी २० चपात्यांचं पार्सल घेऊन आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले.

३) एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विमहन्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की, ही एखादी मानसिक विकृती किंवा आजार असू शकतो, जो कदाचित कुटुंबातील एकाला असेल नंतर इतरांनाही जडत गेला. तसेच हे कृत्य करताना त्यांच्या मनाची नेमकी काय अवस्था असेल यासाठी मनोचिकित्सकांशी बोलावं लागेल, असंही ते म्हणाले.

४) गुन्हे शाखेच्या टीमने घटनास्थळाची मंगळवारी पुन्हा पाहणी केली असता त्यांना एक डायरी सापडली ज्यात २०११ पासूनच्या घटनांच्या नोंदी आहेत. ज्यात मोक्षप्राप्ती, मन:शांती आणि देवाला संतुष्ट करण्याबाबतच्या काही नोंदी सापडल्या.

५) या कुटुंबाच्या घरात आढळलेल्या काही हस्तलिखीत नोट्समध्ये असे म्हटले आहे की, मानवी शरीर शाश्वत नाही, तसंच डोळे व तोंड बंद करून आपण कोणत्याही भीतीवर मात करू शकतो. तसंच त्यात एका अशा तपस्येचा उल्लेख होता ज्यात एका व्यक्तीने वडाच्या झाडासारखं उभं राहायचं असतं आणि बाकीच्यांनी त्याच्या फांद्यांसारखं लटकायचं असतं. तसंच अशी तपस्या केल्यास देव खुश होतो असंही त्या नोंदीत म्हटलं होतं.

६) त्या नोट्समध्ये असेदेखील लिहीलेले सापडले की, ‘धार्मिक विधी मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी करणे आवश्यक आहे.’ तसंच या धार्मिक रीतिरिवाजाच्या दिवशी घरात अन्न शिजविलं जाऊ नये आणि फोन सहा तासासाठी बंद ठेवावा, असंही म्हटलं आहे. 

७) पोलिसांच्या तपासात असे हाती लागले आहे की, घरातील मुलगा ललित याला दहा वर्षांपूर्वी मृत झालेले त्याचे वडील दिसायचे. तो त्यांच्याशी संवाद साधायचा आणि ते मार्गदर्शन करतात तसं मी वागतो असं ललित म्हणाला. आत्महत्या करताना कोण कुठे उभं राहील आणि कशी कृती असेल हे सगळं बाबांनी सांगितल्याचं ललित म्हणाला.

८) ललितने २०११पासून त्या डायरीत नोंद करायला सुरुवात केली. मात्र २०१५ला त्या नोंदी थांबल्या आणि काही कोरी पानं त्या डायरीत दिसली. पुन्हा २०१७ पासून जवळपास रोज तो नोंदी करतच होता.

९) ललित असंही म्हणाला की, त्याचे बाबा ‘येण्याची’ वेळ झाली की त्याला समजायचं. ते यायचे आणि त्याच्याशी बोलायचे. कुटुंबातल्या अनेकांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र बाबा त्यांच्याशी बोलत नसत.

१०) त्यांच्या शेजारच्या लोकांनी बुरारींच्या घरात ११ पाईप असल्याचा उल्लेख केला. मात्र त्यामागेही कोणता गूढ अर्थ आहे, याचा पत्ता लागत नाहीये. अकरा जणांची आत्महत्या आणि ११ पाईप यांचा संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

११) इतकंच नव्हे तर हे कुटुंब कधीच कोणत्या वादात नसायचे, तसेच ते फारच धार्मिक होते. ते कुटुंब रोज जेवणाआधी देवाचे नाव घ्यायचे. त्यांचा प्लायवूडचा व्यवसाय होता.