Jyotiraditya Scindia Dynasty, Rani Laxmi Bai Controversy: इंग्रज, शिंदे राजघराणे आणि राणी लक्ष्मीबाई! दीडशे वर्षांपूर्वीचा वाद, ज्योतिरादित्यांनी इतिहास बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:43 PM2021-12-27T18:43:53+5:302021-12-27T19:11:45+5:30

Jyotiraditya Scindia Dynasty, Rani Laxmi Bai Controversy:ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजघराण्याचा इतिहास बदलत राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन केले आहे. हात जोडले व झुकून नमस्कार केला. असे गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात शिंदे घराण्यापैकी एकाही व्यक्तीने केले नव्हते.

मध्य प्रदेशच्या राजकारणात दोन घटना चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यापैकी एक म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजघराण्याचा इतिहास बदलत राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन केले आहे. हात जोडले व झुकून नमस्कार केला. असे गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात शिंदे घराण्यापैकी एकाही व्यक्तीने केले नव्हते.

यावरून मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदेना असे करणे भाग पडले की त्यांनी राजकीय विरोधकांची तोंडे गप्प करण्यासाठी राजघराण्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला.

कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि शिंदे घराण्यातील वाद हा इतिहासकारांनी नाही तर एका कवितेतून मांडण्यात आला आहे. या वादामुळेच शिंदे राजघराण्यातील कोणीही आजवर कितीही राजकीय परिस्थिती बिकट आली तरी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले नव्हते.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी जे केले ते आजवर कोणत्याही शिंदे घराण्याच्या महाराजांनी केले नव्हते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी अचानक उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्यासह राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळी भेट दिली. तिथे जाऊन हात जोडले, वाकून नमस्कार केला आणि दोन मिनिटे थांबून प्रार्थना करत पुष्पांजली अर्पण केली. काही वेळ तिथे थांबून ते निघाले. याचा व्हिडीओ सोमवारी सकाळी व्हायरल झाला.

1857 मधील इंग्रजांविरोधातील लढ्याची जेव्हा आठवण काढली जाते तेव्हा मध्य प्रदेशमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईंची देखील आठवण काढली जाते. मात्र, याचवेळी शिंदे राजघराण्याने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना गद्दार म्हटले जाते. हिंदूत्ववादी संघटना या घटनेला गद्दारीची उपमा देतात आणि राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करतात.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील आपल्या राजकीय कारकीर्दीत कधी लक्ष्मीबाईंच्या समाधीला भेट दिली नव्हती. मात्र, आता ते भाजपात आल्याने त्यांना तसे करावे लागल्याची चर्चा मध्य प्रदेशात होत आहे. जेव्हापासून ते भाजपात गेले तेव्हापासून त्यांना हा प्रश्न भाजपातील विरोधकही विचारत होते. त्यांची आणि विरोधकांची तोंडे गप्प करण्यासाठी शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

राणी लक्ष्मीबाई कॉलेजमधील इतिहासाचे प्राध्यपक डॉ. सुशील कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे राजघराणे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यातील या वादग्रस्त घटनेबाबत इतिहासात कुठेही उल्लेख नाही. परंतू कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांची गाजलेली कविता वीर रसच्या चार ओळींमध्ये याचा उल्लेख आहे.

खूब लड़ी मर्दानीच्या या पंक्ती आहेत. शेकडो मैलांचे अंतर पार करून राणी कलापीला आली, तिचा घोडा थकला आणि जमिनीवर कोसळला, स्वर्गात गेला. यमुना तटावर पुन्हा राणीकडून इंग्रजांचा पराभव झाला. विजयी राणी पुढे निघाली, ग्वाल्हेरवर सांगितला अधिकार. इंग्रजांचे मित्र शिंदेनी राजधानी सोडली, ही कहानी ऐकली होती, 'खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी', अशा त्या पंक्ती आहेत.