BJP Residential Complex: 'आज सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत; पण भाजप थांबणार नाही', PM मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:58 PM2023-03-28T20:58:45+5:302023-03-28T21:07:17+5:30

BJP Residential Complex: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (28 मार्च) दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी निवासी संकुलाच्या बांधकामात श्रमदान करणाऱ्या मजूर, कारागिरांचीही भेट घेतली. भाजप मुख्यालयाच्या विस्ताराच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी पुजाही केली.

भाजप मुख्यालयासमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी हे संकुल बनवण्यात आले आहे. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाच्या विस्तारासाठी मी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. 2018 मध्ये मी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो होतो, तेव्हा या कार्यालयाचा आत्मा आमचा कार्यकर्ता असल्याचे मी सांगितले होते. या कार्यालयाचा विस्तार म्हणजे केवळ इमारतीचा विस्तार नाही, तर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्वप्नांचा तो विस्तार आहे. आजपासून काही दिवसांनी पक्ष 44 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे.

ते पुढे म्हणाले की, मी पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. मी पक्षाच्या सर्व संस्थापक सदस्यांचेही नमन करतो. हा प्रवास खूप खडतर होता. हा प्रवास कष्टाचा आणि जिद्दीचा प्रवास होता. हा प्रवास म्हणजे विचार आणि वैचारिक विस्ताराचा प्रवास होता. भाजप हा देशाची स्वप्ने पाहणारा छोटा पक्ष होता. ही वास्तू विस्तार पक्षाच्या प्रगतीचे प्रतीक आहे.

आज भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष नाही तर भारतातील सर्वात भविष्यवादी पक्ष आहे. दक्षिण भारतात पक्ष सतत मजबूत होत आहे, ईशान्येत 4 मुख्यमंत्री आहेत. आज आपल्याला अनेक राज्यांमध्ये 50% पेक्षा जास्त मते मिळतात. उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, भाजप हा एकमेव पॅन इंडिया पक्ष आहे. हा विस्तार अजून वाढत जाणार, भाजप थांबणार नाही, असे मोदी यावेळी म्हणाले.

विरोधकांवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, आज तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांची मुळं हादरली आहेत. सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत. भाजपनेच भ्रष्टाचाराविरोधात प्रचार केला आहे. काही पक्षांनी भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. घटनात्मक संस्थांवर हल्ले होत आहेत.

न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. न्यायालयाच्या निर्णयावर शंका घेतली जात आहे. काँग्रेसच्या काळात बँका लुटल्या गेल्या. पण, त्यांच्या आरोपांमुळे देश थांबणार नाही. भाजपला नष्ट करण्यासाठी अनेक कारस्थानं करण्यात आली. मला तुरुंगात टाकण्यासाठी सापळेही लावण्यात आले, पण ते अयशस्वी झाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, घराणेशाही असलेल्या पक्षांमध्ये भाजप हा असा पक्ष आहे जो तरुणांना संधी देतो. आज माता-भगिनींच्या आशीर्वादाने पक्ष पुढे जात आहे. भविष्यातील आधुनिक भारत घडवणे हे आमचे ध्येय आहे. आपल्याला भविष्यातील ध्येये निश्चित करायची आहेत. त्यासाठी आधुनिक साधनसामग्री असली पाहिजे. आपल्याला तीन गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पहिला अभ्यास, दुसरा आधुनिकता आणि तिसरा म्हणजे जगभरातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची शक्ती.

1984 च्या दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. आम्ही 1984 मध्ये संपलो होतो, पण निराश झालो नाही. आम्ही जनतेमध्ये जाऊन जमिनीवर काम करून संघटना मजबूत केली. 2019 मध्ये लोकसभेच्या 2 जागांचा प्रवास 303 वर गेला. भाजप कार्यकर्त्यांना संधी देत ​​आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने सत्तेचे शिखर गाठले आहे.

भाजपने राजकारणाचा विचार बदलला आहे. भाजप एक व्यवस्था आहे, भाजप एक कल्पना आहे, भाजप एक चळवळ आहे. भाजपला जाणून घेण्यासाठी त्याचा स्वभावही समजून घेणे आवश्यक आहे. तेलंगणातही जनतेचा एकमेव विश्वास भाजपवर आहे. भाजपला अजूनही परकीय शक्तींशी मुकाबला करायचा आहे. देशविरोधी शक्तींचाही सामना करावा लागतोय. मला खात्री आहे की तुम्ही (भाजप कार्यकर्ते) अशीच देशाची सेवा करत राहाल, असंही मोदी यावेळी म्हणाले.