Nitish kumar : काय आहे भाजपचा 'प्लॅन 200', ज्यानं वाढवलं होतं नितीश कुमारांचं टेन्शन; जेडीयूसाठी होता मोठा धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:32 PM2022-08-09T18:32:14+5:302022-08-09T18:39:10+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत, जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पलटी मारली आहे. यामागे काही कारण तर नक्कीच असेल. तर जाणून घेऊयात...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत, जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पलटी मारली आहे. विशेष म्हणजे, आता ते त्याच आरजेडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत, ज्या आरजेडीच्या सत्ता काळाला ते जंगलराज म्हणून संबोधत होते. मात्र, आता नितीश कुमारांनी त्याच आरजेडीसाठी भाजपची साथ सोडली आहे. यामागे काही कारण तर नक्कीच असेल. तर जाणून घेऊयात...

यांपैकी एक कारण म्हणजे, भाजपचा 'प्लॅन 200'. पटना येथे 30 आणि 31 जुलैला भाजपने दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन केले होते. यात पक्षाने 2025च्या विधानसभा निवडणुकीसाठी दौऱ्यांच्या कार्यक्रमांची घोषणा केली आहे. या अंतर्गत पक्षाचे नेते 200 मतदारसंघांचे दौरे करून तेथे भाजपला मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

बिहार भाजपचे सह-प्रभारी हरीश द्विवेदी यांनीही या प्लॅन संदर्भात भाष्य केले होते. पक्षाचे नेते भविष्यात राज्यातील सर्वच्या सर्व 243 मतदारसंघाचे दौरे करतील, असे ते म्हणाले होते. भाजपच्या या तयारीकडे जेडीयूसाठी इशारा म्हणूनही पाहिले जात होते.

खरे तर, गेल्या काही वर्षांत भाजप बिहारमध्ये प्रचंड मजबूत झाला आहे. एवढा मजबूत, की तो जेडीयूचा सिनिअर पार्टनर बनला. एवढेच नाही, तर सामाजिक समिकरणांच्या दृष्टीनेही भाजप मजबूत बनला आहे. यामुळे, उद्धव ठाकरेंसारखी स्थिती होऊ नये, म्हणून नितीश कुमारांसाठी हा चिंतेचा विषय बनला होता.

गेल्या निवडणुकीपासूनच वाढलं होतं नितीश कुमारांचं टेन्शन - खरे तर, 2020 च्या विधानसभा निवडणुकीतच जेडीयूचे टेन्शन वाढले होते. या निवडणुकीत भाजपने 121 जागांवर उमेदवार उभे केले होते. यांपैकी 74 जागांवर त्यांचा विजय झाला होता. तर दुसरीकडे, जेडीयूने 122 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांचा केवळ 43 जागांवरच विजय मिळाला होता.

अशा प्रकारे भाजपने जेडीयूच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली होती. याचा परिणाम सरकार स्थापन करतानाही दिसून आला होता. भाजपने सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवले होते. ते नितीश कुमार यांचे जवळचे मानले जात होते. यानंतर भाजपने ज्या नेत्यांची निवड केली, ते अमित शाहंच्या जवळचे मानले जात होते. एवढेच नाही, तर ते सातत्याने नितीश कुमार यांच्या विरोधात भाष्य करत होते.

पुढच्या निवडणुकीत अप्रासंगिक होण्याची होती भीती? - अशा परिस्थितीत, भाजपने 200 जागांची तयारी केली, तर ते निवडणुकीत अधिक जागा मागतील. एवढेच नाही, तर त्याच्या जागांची संख्या वाढली तर ते जेडीयूला अप्रासंगिकही बनवू शकतात, अशी भीतीही कदाचित नितीश कुमारांना वाटत होती. नितीश यांच्या याच भीतीने त्यांना भाजपपासून दूर होण्यासाठी भाग पाडले. जेणेकरून त्यांना त्यांची ताकद टीकवून ठेवता येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र, नितीश यांना भविष्यात राजदसोबतही जुळवून घेणे तेवढे सोपे राहणार नाही.

जेपी नड्डा यांच्या वक्तव्यानेही वाढला होता तणाव - नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय आघाड्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जेपी नड्डा यांनी केलेले वक्तव्यही भाजप-जेडीयू युती तुटण्यास कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. 'सर्व पक्ष संपतील, केवळ भाजपच शिल्लक राहील,' असे वक्तव्य जेपी नड्डा यांनी केले होते. त्यांचे हेच वक्तव्य नितीश यांनी गांभीर्याने घेतल्याचेही बोलले जात आहे. एवढेच नाही तर, जेव्हा व्हीआयपीच्या आमदारांना भाजपमध्ये घेण्यात आले, तेव्हापासून दोन्ही पक्षांमधील अंतर वाढायला सुरुवात झाली होती.