मोदींचे आभार, घराणेशाहीवर निशाणा! नितीश यांचे १० संकेत; बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 10:33 AM2024-01-26T10:33:50+5:302024-01-26T10:43:24+5:30

nitish kumar latest news: नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, असे दावे केले जात आहेत.

बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली असताना खुद्द नितीश यांनी याचे संकेत दिले आहेत.

नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आरजेडी आणि जदयूचे सरकार कोसळेल, ज्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. महाआघाडीत लालू यादव यांचा राजद, नितीश कुमार यांचा जदयू, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे.

नितीश पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. कारण अलीकडेच त्यांनी माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात बोलताना घराणेशाहीवरून टीकास्त्र सोडले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

बिहारमधील घडामोडी पाहता भाजपाचे हायकमांड सक्रिय झाले. बिहार भाजपाचे अध्यक्ष सम्राट चौधरी आणि इतर वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित होते.

खरं तर जेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेचच पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. कर्पुरी यांना भारतरत्न मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गावी पोहचून नितीश यांनी कर्पुरी यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांच्याबद्दल भाष्य केले. तसेच कर्पुरी यांनी कधीच आपल्या मुलाला पुढे आणले नाही. पण आता लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत, असे विधान त्यांनी केले. नितीश यांचा हा टोमणा लालू यादवांना असल्याचे बोलले जाते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये येत आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री या यात्रेत सहभागी होणार नाहीत.

नितीश यांनी राजधानी पाटणा येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली, जी केवळ २५ मिनिटे चालली. यानंतर ना कोणती पत्रकार परिषद झाली ना कोणी प्रतिक्रिया दिली. यावरून बिहारचे मुख्यमंत्री नाराज आहेत असा तर्क लावला जात आहे.

नितीश कुमारांच्या जनता दल युनायटडचे नेते देखील हल्ली भाजपाबद्दल बोलत आहेत. त्यांनी अनेकदा भाजपाच्या बाजूने भूमिका मांडली आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. यातील १६ जागांवर जदयूने दावा ठोकला आहे, तर काँग्रेसने १० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. मात्र, काँग्रेसला JDU चा विरोध आहे.

नितीश कुमार मंगळवारी अचानक राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण, विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या प्रश्नावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याचे सांगण्यात आले.

झारखंडमधील रामगढ येथे ४ तारखेला होणारी नितीश कुमार यांची रॅली रद्द करण्यात आली आहे. याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नितीश म्हणाले की, केंद्र सरकारने कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन आमची एक मागणी केली आहे. आता आणखी एक मागणी लवकरच मान्य होईल अशी आशा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ फेब्रुवारीला बिहारमधील बेतिया येथे रॅली घेणार आहेत, ज्यामध्ये नितीश कुमार देखील सहभागी होणार आहेत. या रॅलीत नितीश कुमार मोदींसोबत स्टेज शेअर करणार आहेत. त्यामुळे सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.