मोठी बातमी! सप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार? विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं बनवला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:14 PM2020-08-08T17:14:00+5:302020-08-08T17:16:50+5:30

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जवळपास ६ महिने शाळा-कॉलेज बंद आहेत, अद्यापही शाळा कधी उघडतील याबाबत ठोस काही कोणीच सांगत नाही. शाळा कधीपासून सुरु होणार हाच प्रश्न शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना लागला आहे.

सध्या देशात २० लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात केंद्र सरकार शाळा उघडण्याबाबत विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

इंडिया टूडेच्या बातमीनुसार केंद्र सरकार सप्टेंबर महिन्यापासून शाळा उघडण्याचा विचार करत आहे. पहिल्या टप्प्यात १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेज सुरु होतील. त्यानंतर ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याची सरकारची योजना आहे.

योजनेनुसार पहिल्या टप्प्यात १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये येण्यास सांगितले जाईल. जर शाळा ४ वर्गात असतील तर एका दिवशी २ वर्ग चालवले जातील. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगच पालन केले जाईल.

त्याचसोबत शाळेचे वेळापत्रकही बदलण्यात येईल. शाळेची वेळ ५-६ तासावरुन २-३ तास इतकी करण्याचा विचार सुरु आहे. सोबतच वर्ग शिफ्टनुसार चालवण्यात येईल, दोन वर्गाच्या दरम्यान शाळेत सॅनिटायझेशन करण्यासाठी दिला जाईल.

शाळेत ३३ टक्के कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी अशाप्रकारे शाळा सुरु करण्याचा विचार आहे. सध्याच्या वेळेत सरकार प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचा कोणताही विचार करणं योग्य नसल्याचं मानत आहे. त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवणार आहे.

शाळा सुरु करण्याबाबत या महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकारकडून नोटिफिकेशन काढण्यात येईल. यामध्ये योग्य त्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश असेल. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारवर सोपवला आहे.

राज्यातील शिक्षण सचिवांना याबाबत मागच्या आठवड्यात पत्र पाठवलं आहे. ज्यात शाळा सुरु करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यास सांगितले आहे. कधीपर्यंत शाळा सुरु कराव्यात याबाबत पालकांना विचारलं आहे, त्याचा अहवाल केंद्राला पाठवण्यात यावा असं सरकारने सांगितले आहे.

सध्या हरियाणा, केरळ, बिहार, आसाम आणि लड्डाख यांनी ऑगस्टमध्ये, राजस्थान, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांनी सप्टेंबर महिन्यात शाळा सुरु कराव्यात असं सांगितले आहे.

दरम्यान, अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीत. शाळा सुरु होण्याची चर्चा ऐकल्यानंतर काही पालकांनी याचा विरोध केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय नुकसानीचा आहे असं पालकांचे मत आहे.

स्विझरलँडमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. इस्त्राईलमध्ये शाळा सुरु केल्यानंतर एक महिन्याच्या आत पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत. कारण त्याठिकाणी कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वेगाने वाढत आहे.