शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: घरात आता एकालाच मिळणार PM किसानचे पैसे; असे आहेत नवे नियम-अटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:17 IST2025-01-18T09:06:58+5:302025-01-18T09:17:18+5:30
PM Kisan Yojna: मागच्या काळात एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी होते. असे बरेच कुटुंब आढळले होते.

पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मागच्या काळात एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी होते. असे बरेच कुटुंब आढळले होते.
आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी वर्ष २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर, इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत, त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार: मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्राप्त करण्यास पात्र राहणार नाही.
दोन वर्षांपूर्वी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले होते. आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतला असेल तर रक्मम वसूल केली जाईल.
पीएम किसानचे पैसे कधी येणार? १ पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. त्यामुळे १९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकार पुढील महिन्यात २ फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करू शकते. त्यासाठी आकड्यांची जमवाजमव सुरू असून, तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवली असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८मध्ये करण्यात आली होती.
योजनेचे १८ हप्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत. १९व्या हप्त्याची प्रतीक्षा असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो मिळण्याची आशा लाभार्थी शेतकऱ्यांना आहे.
वारंवार केवायसी का ? पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात. योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुन्हा तीच कागदपत्रे पाठवावी लागतात.