गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:54 IST2025-07-18T12:54:08+5:302025-07-18T13:54:19+5:30

नीनाला तिच्या मुलींसह परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांना गुहेजवळ तिचा पासपोर्ट सापडला असून तिला रशियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे.

कर्नाटकातील गोकर्ण येथील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे ती बिझनेस व्हिसाद्वारे भारतात आली होती, याची मुदत २०१७ मध्येच संपली होती.

सरकार तिला हद्दपार करण्याची तयारी करू शकते असे वृत्त आहे. सध्या याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

दरम्यान, आता तिच्या जोडीदाराच्या संदर्भामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. त्याला मुलींचा संयुक्त ताबा हवा आहे.

४० वर्षीय नीना कुटीना तिच्या ६ आणि ८ वर्षांच्या दोन मुलींसह गुहेत सापडल्या. पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर हिंदू धर्म आणि भारतातील आध्यात्मिक परंपरांचा खूप प्रभाव होता, म्हणून ती गोव्यामार्गे गोकर्ण येथे पोहोचली.

नीना तिच्या प्रेया आणि एम्मा नावाच्या दोन मुलींसह सुमारे दोन आठवड्यांपासून जंगलाच्या मध्यभागी पूर्णपणे एकांतवासात राहत होती.या लहान कुटुंबाने घनदाट जंगल आणि उंच उतारांनी वेढलेल्या गुहेत घर बनवले होते.

नीना यांना मुलींसह एफआरआरओ किंवा परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांना गुहेजवळ तिचा पासपोर्ट सापडला आणि तिला रशियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे.

आता त्यांच्या मुलींबाबत नवीन माहिती समोर आली आहे. त्यांच्या वडिलांनी मुलींच्या संयुक्त ताब्याची मागणी केली आहे.

त्यांना डिपोर्ट करण्याची प्रक्रिया लांब आणि गुंतागुंतीची असू शकते. त्यासाठी नीना यांना खूप पैसेही मोजावे लागू शकतात. भारत आणि रशियन सरकार तिघांच्या प्रवासाचा खर्च देण्याची शक्यता कमी आहे.

या तिघांना तुमाकुरुमधील डिब्बूर येथील फॉरेनर्स डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. व्हिसा संपल्यानंतरही कुटुंब तिथेच राहत होते, यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. व्हिसा संपल्यानंतर कोणी त्यांना मदत करत होते का किंवा इतर कोणताही गट यात सामील आहे का याचाही अधिकारी तपास करत आहेत.

इस्रायली नागरिक ड्रोर गोल्डस्टीन यांनी त्यांच्या मुलींचा संयुक्त ताबा मागितला आहे. बुधवारी पीटीआयशी बोलताना गोल्डस्टीन म्हणाले, "मला आठवड्यातून काही वेळा माझ्या मुलींना भेटायचे आहे आणि त्यांची काळजीही घ्यायची आहे. जर त्या आता रशियाला गेल्या तर त्यांच्याशी संपर्क राखणे कठीण होईल. म्हणून, मला वाटते की त्यांनी भारतातच राहावे."

गोल्डस्टीन म्हणाले की, ते वर्षातून सुमारे सहा महिने गोव्यात राहतात. गेल्या काही वर्षांपासून कुटीनापासून वेगळे राहत होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलींसह गोवा सोडल्यापासून त्यांचा तिच्याशी कोणताही संपर्क नव्हता.