गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ६ वर्षांपूर्वी काय करायचे..? वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 09:36 PM2021-09-12T21:36:08+5:302021-09-12T21:39:09+5:30

आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री होत असलेल्या भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास रंजक राहिलाय

भारतीय जनता पक्षानं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड केली. पटेल यांची निवड करत भाजपनं अनेकांना धक्का दिला. मुख्यमंत्रिपदासाठी मोठमोठी नावं चर्चेत असताना भाजपनं पटेल यांना संधी दिली. त्यांचं नाव कधीच मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत नव्हतं.

भूपेंद्र पटेल माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. आनंदीबेन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातून पटेल यांनी निवडणूक लढवली. विशेष म्हणजे आमदार म्हणून पटेल यांची फर्स्ट टर्म सध्या सुरू आहे. पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी दिग्गजांची नावं चर्चेत असताना भूपेंद्र पटेल यांची निवड झाली. अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पटेल यांनी दोनदा अहमदाबाद महानगरपालिकेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

आमदारकीच्या पहिल्याच फटक्यात थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे भूपेंद्र पटेल ५९ वर्षांचे आहेत. सिव्हिल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलेले पटेल पेशानं बांधकाम व्यवसायिक आहेत. सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ते ट्रस्टी आहेत.

अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद भूषवण्याआधी पटेल नगरसेवक होते. २०१० ते २०१५ या कालावधीत त्यांनी अहमदाबाद महानगरपालिकेत थालतेज वॉर्डचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर २०१५ ते २०१७ त्यांनी अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद सांभाळलं. २०१७ मध्येच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेस उमेदवाराचा तब्बल १ लाख १७ हजार इतक्या मताधिक्क्यानं पराभव केला.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात पुढे होती. मात्र यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास दुसरा गट नाराज होणार हे निश्चित होतं. त्यामुळे गटबाजी टाळण्यासाठी भूपेंद्र पटेल यांचं निश्चित करण्यात आलं.

पाटीदार समाजाची नाराजी, कोरोना काळातील सुमार कामगिरी यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीत नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपनं रुपाणींना हटवलं. आगामी निवडणुकीत पाटीदार समाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे त्यांची नाराजी ओढवून घेण्याची भाजपची तयारी नाही.

राज्यात आतापर्यंत लेवा पाटीदार समाजातून अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र पटेल यांच्या रुपात राज्यात प्रथमच कदवा पाटीदार समाजातील व्यक्तीकडे नेतृत्त्व असेल. पाटीदार व्होटबँक कायम ठेवण्यासाठी भाजपनं ही खेळी केली आहे.

सध्या घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार असलेले भूपेंद्र पटेल बऱ्याच कालावधीपासून भाजपचे कोषाध्यक्ष राहिले आहेत. कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांचा उत्तम संपर्क आहे. विशेष म्हणजे संघाशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. यासोबतच प्रसिद्धीपासून ते दूर असतात.