Bharat Jodo Yatra: अवघ्या ६ तासांत बनतं गाव, भारत जोडो यात्रेत कशी असते राहण्याची व्यवस्था?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:03 PM2022-11-29T16:03:03+5:302022-11-29T16:05:18+5:30

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींशिवाय १४० भारत यात्री आहेत. त्यांचा दररोज नवीन ठिकाणी मुक्काम असतो. त्यांचा कँम्प एखाद्या लहानशा गावासारखा असतो. दररोज टप्प्यासाठी हे गाव वसवलं जातं आणि दुसऱ्यादिवशी गुंडाळलं जाते.

अवघ्या ६ तासात हे गाव तयार होतं. प्रत्येक टप्प्यावर यात्रेकरूंना थांबण्यासाठी हे कंटेनर पुन्हा नवीन जागेवर उभे केले जाते. तेथे पाणी, वीज, सांडपाण्याची लाईन अशी सर्व कामे काही तासांत पूर्ण करावी लागतात.

यात्रेचे सहयोजक जयराम रमेश सांगतात की, हे कंटेनर ट्रेनच्या कंपार्टमेंटसारखे आहेत. काहीमध्ये १, २, ४, ६, ८ आणि १२ बेडचे कंटेनर आहेत. मी जिथे थांबतो तिथे २ बेड आहेत. VIP कंटेनरमध्ये वॉशरूमशिवाय सोफासेट, छोटी लायब्ररी, चार्जिंग पॉईंट, एसी असतात.

ज्या कंटनेरमध्ये ६ ते ८ बेड्स असतात. त्यात वॉशरूम नसते. त्यांच्यासाठी वेगळे मोबाईल टॉयलेट असते जे कंटेनरसोबतच उभे केले जाते. मोठ्या कंटेनरमध्ये मोबाईल लायब्रेरी असते. जेणेकरून यात्रेत सहभागी झालेल्यांना त्यांच्या आवडीचं पुस्तकं वाचायला मिळतील.

प्रत्येकाला स्वतंत्र कंटेनर नाही. फक्त राहुल गांधी यांच्याकडे २ कंटेनर आहेत. एकात ते स्वतः राहतात आणि दुसऱ्यात त्याचे स्वयंपाकघर आहे. याशिवाय इतरही अनेक व्हीआयपी कंटेनर्स आहेत. प्रियंका गांधी आल्या तेव्हा त्या आपल्या कुटुंबासह याच कंटेनरमध्ये राहिल्या.

बाकीचे कंटेनर रेल्वेच्या डब्यासारखे आहेत. काहींमध्ये २, काहींमध्ये ४, सहा आणि आठ आणि १२ बेड आहेत. दररोज रात्री सुमारे २५० लोक कॅम्पमध्ये राहतात. यामध्ये १४० नियमित लोक आहेत तर उर्वरित राज्यातील प्रवासी आहेत.

आमच्या कॅम्पसाठी आम्हाला किमान २ एकर जमीन हवी असते. आम्ही एका ठिकाणी दोन रात्री थांबत नाही, आम्ही दररोज जागा बदलतो. आम्ही आठवडाभर आधीच ठरवतो की आम्हाला कुठे राहायचे आहे. त्यासाठी जमीन पाहण्याचे काम आधीच झाले आहे असंही जयराम रमेश यांनी सांगितले.

कॅम्प साईटच्या मुख्य गेटवरच मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकजण सुरक्षा तपासणीतून जातो. सुरक्षेत सीआरपीएफचे ३० जवान सहभागी आहेत. आत आणखी एक गेट आहे. प्रवासी यात्रेकरू सहसा एकमेकांच्या कंटेनरमध्ये प्रवेश करत नाहीत.

कंटेनर ट्रॉलीवर असतात. एकाच वेळी ६० कंटेनर रस्त्यावर उतरले की एका टोकाला असलेली वाहतूक ठप्प होते. या कारणास्तव इतर वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही याप्रकारे कंटेनरची कॅम्प सोडण्याची वेळ असते.

जेव्हा हे कंटेनर निघतात तेव्हा रस्त्यावर मालगाडी चालल्यासारखे दिसते. रेल्वेच्या डब्यांसारखे दिसणारे कंटेनर पाहण्यासाठी लोक रस्त्यावर थांबतात. राहुल गांधी ७ सप्टेंबरपासून यात्रेत पायी चालत असून आतापर्यंत ६ राज्यांमध्ये २००० किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.