Bharat Bandh: आंदोलनाला हिंसक वळण, नऊ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 10:29 PM2018-04-02T22:29:23+5:302018-04-02T22:29:23+5:30

नवी दिल्ली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी सोमवारी (दि.2) पुकारलेल्या 'भारत बंद'ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांसह इतर राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

यावेळी आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको केला. तर, काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या.

भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत देशभरात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील सहाजणांचा तर यूपीतील दोघांचा आणि राजस्थानमधील एकाचा समावेश आहे.

सोमवारी सकाळपासूनच देशभरातील अनेक राज्यात भारत बंदचे हिंसक पडसाद उमटले. जास्तकरुन उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंडमध्ये अनेक दलित आणि आदिवासी संघटनांनी आंदोलन केले.

या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. तर उत्तर प्रदेशात मेरठमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, त्यात एकाचा मृत्यू झाला.

ग्वाल्हेरमध्ये आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.