राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:06 IST2025-07-22T09:01:23+5:302025-07-22T09:06:18+5:30

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचं कारण देत त्यांच्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षांसह सत्तेतील खासदारांनी तर्क-वितर्क लढवणं सुरू केले आहे. राज्यसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यासोबत उपराष्ट्रपतींशी अनेकदा वादविवादाचे खटके उडाले. त्यांनी सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजता धनखड यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
या संवादावेळी जगदीप धनखड हे त्यांच्या कुटुंबासोबत होते. त्यांनी उद्या बोलूया असा निरोप दिला. त्याआधी संध्याकाळी ५ वाजता जयराम रमेश, प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह हे धनखड यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळीही सर्व काही सुरळीत असल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी १० वाजता कामकाज समितीची बैठक होईल असं धनखड यांनी त्यांना सांगितले होते.
विशेष म्हणजे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयातही हालचाली वाढल्या होत्या. एका भाजपा खासदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते की, एका सफेद कागदावर आमच्या सह्या घेतल्या जात आहेत. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती पुढे आली आहे.
काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना या घटनाक्रमावर विश्वास बसत नाही कारण धनखड यांच्या भेटीनंतर ते संध्याकाळी ६ च्या सुमारास सर्वात शेवटी त्यांच्या केबिनमधून बाहेर पडले होते. धनखड यांची तब्येत ठीक होती, त्यांनी राजीनामा देण्याचे संकेतही दिले नाहीत. त्याऐवजी राज्यसभा सभापती धनखड यांनी त्यांना एका समितीत घेतले जात आहे, ज्याबाबत ते नंतर सविस्तर सांगतील असं म्हटले होते.
जगदीप धनखड यांचा राजीनामा प्रथमदर्शनी सामान्य दिसत असेल परंतु या राजकीय हालचालींमागे बरेच मोठे वादळ येत असल्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी न्यायाधीश वर्मा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाबाबत विरोधी पक्षाची नोटीस स्वीकारली. त्याचवेळी म्हणजे दुपारी २ च्या सुमारास खालील सभागृहात १०० हून अधिक सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या खासदारांनी न्या. वर्माविरोधात महाभियोग प्रस्तावाच्या नोटिशीवर सही केली होती.
दुपारी ४.०७ मिनिटांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी महाभियोग प्रस्तावावर ६३ विरोधी पक्षाच्या खासदारांची नोटीस मिळण्याची सविस्तर माहिती दिली. न्यायाधीशांविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावावर दोन्ही सभागृहात नोटीस दिल्या जातात तेव्हाच्या प्रक्रियेची त्यांनी आठवण करून दिली. धनखड यांनी सभागृहात प्रक्रियेची माहिती दिली आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना कनिष्ठ सभागृहात नोटीस देण्यात आली आहे की नाही याची पुष्टी करण्यास सांगितले.
त्यानंतर जगदीप धनखड यांनी संयुक्त समिती स्थापन करून नियमांनुसार पुढील कारवाई करण्याचे सांगितले. धनखड यांनी संपूर्ण प्रक्रियेवेळी किंवा शेवटचे संबोधन करतानाही कुठेही आरोग्याबाबत अथवा राजीनाम्याबाबत कुठलेही संकेत दिले नाहीत हे यावरून स्पष्ट दिसून येते.
सोमवारी संध्याकाळी संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाबाहेर बऱ्याच हालचाली दिसून येत होत्या. यावेळी अनेक बैठका झाल्या. भाजपा खासदार राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात गेले परंतु काहीही न बोलता तिथून परतले. भाजपा खासदारांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या असं एका खासदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
विरोधी पक्षातील खासदार या गोष्टीने उत्साहित होते की महाभियोग प्रस्ताव सर्वात आधी राज्यसभेत आणला जाईल. कारण राज्यसभेचे सभापती भारताचे उपराष्ट्रपतीही असतात आणि प्रोटोकॉलनुसार ते सरकारमध्ये स्पीकर पदाहून मोठे असतात. परंतु राज्यसभेतील काही अधिवेशन धनखड यांच्यासाठी आव्हानात्मक काळ होता. कारण त्यांनी अनेकदा सहकार्य केले आणि दोन्ही बाजूची नाराजी ओढावून घेतली होती.
विरोधकांनी जगदीप धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. चेअरमनविरोधात अविश्वास प्रस्तावही आणला, यात उपसभापतींनी निर्णय सुनावत सभापतींविरोधातील प्रस्ताव फेटाळला होता. आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्येही संभ्रम आहे. याबाबत इंडिया आघाडीचे नेते मंगळवारी सकाळी बैठक घेणार आहेत. त्यात धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा होईल.