मोफत मिळतात ५ लाखांपर्यंतचे उपचार! या सरकारी योजनेशी जोडले गेलेत ४.५ कोटी लोक, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 13:14 IST2022-12-18T13:04:24+5:302022-12-18T13:14:22+5:30

केंद्र सरकार देशातील गरीबांना मोफत उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना (Ayshman Bharat Yojna) चालवते. या योजनेशी आतापर्यंत कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. यात लोक पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार अगदी मोफत उपलब्ध करुन दिले जातात.
आतापर्यंत ४.५ कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. २०१८ साली केंद्रानं या योजनेची सुरुवात केली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी संसदेत या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली.
मनसुख मांडविय म्हणाले की, आयुष्मान भारत योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना बनली आहे. या अंतर्गत आतापर्यंत ४.५ कोटी नागरिकांना एक रुपयाही खर्च न करता वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ३.८ कोटी इतकी होती.
गेल्या तीन महिन्यात या योजनेशी १ कोटी लोक जोडले गेले आहेत. येत्या दिवसात आम्ही सर्व मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमध्ये इंटीग्रेटिव्ह मेडिसीनसाठी वेगवेगळे विभाग बनवण्याच्या दिशेनं काम करत आहोत.
सरकार देतं गोल्डन कार्ड
केंद्राच्या या योजनेत कोणताही व्यक्ती ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनं अर्ज करू शकतो. आयुष्मान भारत सरकारची एक हेल्थ स्कीम आहे ज्या अंतर्गत सरकार आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लोकांना दिलं जातं. या स्कीम अंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डच्या माध्यमातून आर्थिक पातळीवर कमकुवत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार प्रदान केले जातात.
अर्ज करण्याची वयोमर्यादा
आयुष्मान भारत स्कीमसाठी अर्ज करणाऱ्याचं वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावं. जर एखादा व्यक्ती स्वत:साठी अर्ज करत असेल तर त्याचं नाव SECC-2011 मध्ये नमूद असणं गरजेचं आहे. SECC म्हजे सामाजिक आर्थिक आणि जाती गणना होय. जर तुम्ही स्कीमचा लाभ घेऊ इच्छिता तर आधी पात्रता तपासून पाहणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
असा करा ऑनलाइन अर्ज
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉगइन करा. त्यानंतर आपला मोबाइल नंबर आणि स्क्रीनवर दिला गेलेला कॅप्चा कोड नमूद करा.
यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP नंबर येईल तो नमूद करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर नवं पेज ओपन होईल. यात तुमचं राज्य निवडा.
आपली पात्रता तपासून पाहण्यासाठी मोबाइल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर नमूद करा. तुमचं नाव जर पेजच्या उजव्या बाजूला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. याशिवाय तुम्ही नजिकच्या जनसेवा केंद्रावर जाऊन देखील पात्रता तपासून पाहू शकता.