कुणी म्हणे थायलंड, कुणी अफगाणिस्तान... 'खऱ्या अयोध्ये'चे दावे वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 02:24 PM2020-07-15T14:24:59+5:302020-07-15T14:39:44+5:30

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अयोध्येवर वक्तव्य करून भारत आणि नेपाळचे संबंध आणखी खराब केले आहेत. ओली म्हणाले, अयोध्या नेपाळच्या बीरगंजमध्ये आहे. येथेच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. एवढेच नाही, तर माता सीता यांचा विवाह उत्तर प्रदेशातील प्रभू रामचंद्राशी झालाच नव्हता असेही ते म्हणाले, तेव्हापासून 'खरी अयोध्या कोठे' याविषयावर वाद पेटला आहे.

भारतात लिहिले गेलेले वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस यांच्यानुसार, अयोध्या उत्तर प्रदेशात आहे. यानुसार, प्रभू श्रीरामांचा जन्म येथेच झाला होता. मात्र, पुरातत्व विभागाच्या पुराव्यांच्या कमतरतेमुळे या मुद्द्यावर वाद होत आहे.

भगवान श्रीरामांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येतच झाला, याचा उल्लेख मंगोलिया, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये सांगितल्या जाणाऱ्या दंतकथांतूनही होत आला आहे. अयोध्येसंदर्भात अनेक लेखकांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र, लोकांच्या मान्यतेनुसार अयोध्या उत्तर प्रदेशातच असल्याचे मानले जाते.

1992 मध्ये इतिहासकार श्याम नारायण पांडे यांनी, 'एनशियंट जिओग्राफी ऑफ अयोध्या' यात म्हटले आहे, अयोध्या अफगाणिस्तानच्या हेरात शहरात होती. यानंतर पाच वर्षांनी 1997 मध्ये पांडे यांनी इंडिअन हिस्ट्री काँग्रेसमध्ये याच थेरीवर 'हिस्टोरिकल रामा डिस्टिंग्विश्ड फ्रॉम गॉड रामा' या नावाने एक पेपर प्रेझेंट केला होता.

यानंतर एका वर्षांने 1998 मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ एमव्हीएन कृष्णा राव यांनी सांगितले, की अयोध्या हरियाणातील बनावलीमध्ये होती. यासाठी त्यांनी सिंधू खोऱ्यातील मोहर आधार मानली होती. एवढेच नाही, तर हरियाणातील ऐतिहासिक सरस्वती नदीच्या काठावर अयोध्या वसली होती, असा दावाही त्यांनीकेला होता.

एढेच नाही, तर राव यांनी श्रीरामांना सुमेरचे राम-सिन-प्रथम यांच्या प्रमाणे दर्शवले होते. आज सुमेर इराकमध्ये आहे. राव यांच्यानुसार, इराकमधील बेबीलोनचा राजा हम्मुराबी हा रामायणातील रावण होता.

2000 मध्ये राजेश कोचर यांचे 'द वैदिक पीपुलः देअर हिस्ट्री अँड जिओग्राफी', हे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात कोचर यांनी दावा केलाय, की भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला नव्हता. त्यांच्या मते शरयू नदी अफगानिस्तानच्या हरोयू अथवा हरी-रुड येथे होती. पुरानाचा दाखला देत कोचर यांनी असा अर्थ काढला आहे, की भगवान राम अफगानिस्तान आणि पूर्व इरानच्या कुण्या भागात राहत होते.

2015 मध्ये ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अब्दुल रहीम कुरैशी यांनी 'फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपीसोड' नावाने एक पेपर प्रसिद्ध केला होता. यात त्यांनी दावा केला होता, की भगवान श्रीरामांचा जन्म पाकिस्तानातील रहमान डेहरी येथे झाला होता.

थायलंडमध्येही अयोध्या असल्याचा दावा केला जातो. येथेही प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याचा पुरावा दिला जातो. येथील अयोध्या मध्य युगातील शहर अयुथाया येते होती. आज येथे एक ऐतिहासिक पार्क तयार करण्यात आला आहे.

म्हटले जाते, की थायलंडच्या जुन्या सियाम साम्राज्याच्या काळात राजा यू थॉन्ग 14व्या शतकातील मध्यात अयुथाया येथे पोहोचले होते. त्यांनी येथेच आपली राजधानी तयार केली होती. मात्र, स्मॉल पॉक्स पसरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. हा प्रदेश चाओ फ्राया नदीच्या काठावर होता. थाई भाषेत फ्रायाचा अर्थ शाही संबंध, असा होतो.

मात्र, या सर्व ठिकानांवर रामायणानुसार, अयोध्येचा पुरावा मिळत नाही. एक दावा असाही केला जातो, की अयोध्या हे नाव 11व्या शतकात पडले. यापूर्वी त्याला साकेत म्हटले जात होते.