चर्चा तर होणारच! ५० कोटींचा आश्रम, ७.५ कोटींच्या लग्झरी कार अन् बरेच काही; कोण आहे सतुआ बाबा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:46 IST2026-01-19T15:40:49+5:302026-01-19T15:46:47+5:30

ज्या वयात मुलांच्या खेळण्याचं वय असते त्या वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी घर सोडले होते. आज ते सतुआ बाबा या नावाने ओळखले जातात. उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथे जन्मलेले संतोष तिवारी कालांतराने सतुआ बाबा म्हणून नावारुपाला आले.

सध्या सतुआ बाबा माघ मेळ्यात सर्वत्र चर्चेत आले आहेत. ते वाराणसीतील विष्णुस्वामी पंथाचे प्रमुख आहेत. सतुआ बाबा शोभाराम तिवारी यांच्या घरातील चार भावंडांमध्ये सर्वात छोटे आहेत. पारंपारिक शालेय शिक्षणात मन लागत नसल्याने ते अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी वयाच्या ११ व्या वर्षी घर सोडले.

सतुआ बाबा यांना त्यांचा मोठा भाऊ महेश तिवारी यांनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर नेले. जिथे त्यांनी मुख्य पुजारी यमुनाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनात विष्णू स्वामी संप्रदाय सतुआ आश्रमात प्रवेश घेतला. संतोष तिवारी यांनी लवकरच धार्मिक अभ्यास सुरू केला आणि ते प्रिय विद्यार्थी म्हणून पुढे आले.

२००५ साली संतोष तिवारी म्हणजेच सतुआ बाबा यांनी औपचारिकपणे वैवाहिक जीवनाचा त्याग करून सन्यास घेतला. त्यांचे गुरु जिवंत असताना महामंडलेश्वर आणि उत्तराधिकारी म्हणून त्यांना घोषित केले होते. २०११ मध्ये यमुनाचार्य महाराज यांच्या निधनानंतर संतोष यांनी विष्णू स्वामी संप्रदायाचे नेतृत्व स्वीकारले.

२०१२ साली संतोष तिवारी हे ५७ वे आचार्य बनले आणि सत्तू बाबा म्हणून त्यांना उपाधी मिळाली. ही उपाधी आश्रमातील पीठाधीश्वर म्हणजेच मुख्य पुजारी यांना दिली जाते. त्याची परंपरा १९९० च्या दशकात सुरू झाली.

सतुआ बाबा यांना काशी विश्वनाथचे प्रतिनिधी मानले जाते. त्यांना २०२५ च्या महाकुंभवेळी जगदगुरू उपाधी मिळाली होती. माघ मेळ्यात सतुआ बाबा यांच्या आश्रमासाठी सर्वात जास्त जमीन वितरित केली आहे. परंतु त्याची चर्चा तेव्हा झाली जेव्हा त्यांची पोर्श ९११ टर्बो (४.४कोटी), लँड रोवर डिफेंडर(३ कोटी) अशा कोट्यवधीच्या कारसोबत फोटो व्हायरल झाले.

सतुआ बाबाच्या शिबिराबाहेर या अलिशान गाड्या उभ्या होत्या. त्यांच्या भगव्या वस्त्रांचे, ब्रँडेड सनग्लासेसचे आणि त्यांच्याकडील उच्च-प्रोफाइल पाहुण्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांचे समर्थन करणारेही पुढे आले.

अलीकडेच धार्मिक आणि राजकीय वर्तुळात सतुआ बाबांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्म आणि आध्यात्मिक एकतेचा प्रचार केल्याबद्दल सतुआ बाबांचे जाहीर कौतुक केले. २०२५ च्या महाकुंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह ज्येष्ठ संत आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना जगद्गुरू ही पदवी प्रदान करण्यात आली.

एकेकाळी साधेपणासाठी ओळखले जाणारे सतुआ पीठाकडे आता उत्तर प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये संपत्ती आहे. एकट्या वाराणसीतील आश्रमाची किंमत अंदाजे ₹५० कोटी असल्याचे सांगितले जाते. या मालमत्ता धार्मिक कारणांसाठी आहेत असं सतुआ बाबा म्हणतात. शिवाय सतुआ बाबांकडे लक्झरी कारचा संग्रह आहे. आणि ते अनेकदा रे-बॅन सनग्लासेस घालताना दिसतात.

सतुआ बाबाची एकूण संपत्ती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, परंतु एका अहवालांनुसार त्यांच्या कारच्या किंमती ₹१० कोटींपेक्षा जास्त आहे. अंदाजानुसार, पंथ, त्यांच्या जमिनी आणि इतर मालमत्तेसह एकत्रित केल्यास सतुआ बाबाची एकूण संपत्ती ₹१५ ते ₹३० कोटी किंवा त्याहून अधिक असू शकते.

















