असदुद्दीन ओवेसी खाली वाकले, त्यामुळे मी पुन्हा गोळीबार केला, पण...; मुख्य आरोपीची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 09:05 IST2022-02-06T08:55:14+5:302022-02-06T09:05:04+5:30
सचिन व शुभम अशा दोघांना ओवेसींवर हल्ला केल्याबद्दल अटक केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) प्रचारासाठी आलेल्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गुरुवारी दोन जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन्ही आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांच्या चौकशीत त्यांनी या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करुन दिल्लीला परतत असताना पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे सोडून पळून गेले. या हल्ल्यानंतर ओवेसींनी स्वतः आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सचिन आणि शुभम अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
एआयएमआयएमचे प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना ठार करण्याचा माझा हेतू व प्रयत्न होता. त्यासाठीच त्यांच्यावर गोळीबार केला, अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन याने पोलिसांना दिली.
हल्लेखोरांनी गुरुवारी ओवेसी यांच्या कारवर गोळीबार केला, पण सुदैवाने ते त्यातून बचावले. हल्लेखोर अनेक दिवस ओवेसींच्या मागावर होते. सचिन व शुभम अशा दोघांना ओवेसींवर हल्ला केल्याबद्दल अटक केली.
सचिनने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, ओवेसी करत असलेल्या भाषणांमुळे आम्ही संतापलो होतो. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याचा कट आखला.
मी जेव्हा ओवेसी यांच्या दिशेने गोळीबार केला, तेव्हा ते खाली वाकले, त्यामुळे मी त्या दिशेने पुन्हा गोळीबार केला. त्यांना गोळ्या लागल्या असाव्यात, असे मला वाटले. या हल्ल्यानंतर आम्ही तिथून पळून गेलो, असे सचिनने म्हटले आहे.