शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अधुरी एक कहाणी! भारतीय राजकारणातील फिल्मीस्टाईल लव्हस्टोरीची धक्कादायक अखेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 9:05 PM

1 / 10
काँग्रेसचे राजस्थानमधील दिग्गज नेते सचिन पायलट यांनी पत्नी सारा पायलट यांच्यापासून घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह राजकीय वर्तुळातून आश्चर्यं व्यक्त केले जात आहे.
2 / 10
काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या कन्या सारा यांनी २००४ मध्ये लग्न केले होते. आता सचिन पायलट यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रामधून दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन पायलट आणि सारा यांना आरान आणि वेहान हे दोन मुलगे आहेत.
3 / 10
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेले असताना तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती. राजेश पायलट आणि फारुख अब्दुल्ला हे एकमेकांचे मित्र होते. तसेच ते एकमेकांच्या कुटुंबीयांना ओळखत होते. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांशी परिचित नव्हते.
4 / 10
सचिन पायलट हे एमबीएचं शिक्षण घेत असताना त्यांची सारा अब्दुल्ला यांच्याशी मैत्री झाली. बघता बघता या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लग्नाचा मार्ग तितकासा सोपा नव्हता.
5 / 10
सचिन आणि सारा दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या त्यांच्या राज्यातील दिग्गज राजकीय परिवार होते. मात्र या दोघांच्याही लग्नात सर्वात मोठा अडथळा होता तो त्यांचा धर्म. सचिन पायलट हे हिंदू गुर्जर कुटुंबातील आहेत. तर सारा एका परंपरावादी मुस्लिम कुटुंबातील होती.
6 / 10
आपल्या विवाहाला दोन्ही कुटुंबातून मान्यता मिळणार नाही, याची या दोघांनाही कल्पना होती. दरम्यान, सचिन पायलट यांनी आपल्या आईला याबातत सांगितले. मात्र त्यांनी हे नाते मान्य करण्यास नकार दिला. सचिन पायलट यांचं संपूर्ण कुटुंब या नात्याच्या विरोधात होतं. तर सारा अब्दुल्ला यांच्या वडिलांनीही या नात्याला विरोध केला.
7 / 10
दरम्यान, सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांचं प्रेमप्रकरण जाहीर झालं तेव्हा फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात काश्मीर खोऱ्यामध्ये आंदोलन सुरू झाले होते. तसेच त्यांच्या पक्षातीलच काही आमदार या नात्याविरोधात गेले होते.
8 / 10
तेव्हा काही महिन्यांनी हे सर्व प्रकरण शांत होईल. म्हणून, सचिन आणि सारा यांनी वाट पाहिली. पण कितीही काळ गेला तरी परिस्थिती बदलणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. तसेच पक्षाच्या आमदारांसमोर झुकण्याशिवाय फारुख अब्दुल्ला यांच्यासमोर कुठलाही मार्ग नव्हता.
9 / 10
अखेरीस सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांनी जानेवारी २००४ मध्ये एका छोट्या कार्यक्रमामध्ये विवाह केला. या सोहळ्यामध्ये मोजक्या लोकांनाच निमंत्रित करण्यात आले होते. अब्दुल्ला कुटुंबाने या विवाह सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.
10 / 10
विवाहानंतर सारा अब्दुल्ला ह्या सारा पायटल बनल्या. सचिन पायलट आणि सारा यांना दोन मुलगे झाले. काळाबरोबरच फारुख अब्दुला यांचा रागही शांत झाला. पुढे काही दिवसांनी सचिन पायलट राजकारणात आले आणि खासदार झाले. आता राजकीय वर्तुळातील चर्चित जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्याने एका प्रेमकहाणीचा कटू शेवट झालाय.
टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवार