Amit Shah, Ajit Doval: अमित शाह, अजित डोवालांचा प्लॅन लीक झाला; नक्षलवाद्यांनी दहशतवाद्यांसारख्या हालचाली सुरु केल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:31 PM2021-10-08T19:31:54+5:302021-10-08T19:39:16+5:30

Amit Shah, Ajit Doval's Operation leak: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात 26 सप्टेंबरला एक महत्वाची बैठक झाली होती. यामध्ये नक्षल प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते.

काश्मीरमध्ये पाकिस्तानद्वारे दहशतवाद्यांना रुपयांपासून शस्त्रास्त्रे, दारुगोळा दिला जातो. भारताने युएनसमोर देखील ही बाब ठेवली आहे. परंतू आता नक्षलवादीदेखील अशाच प्रकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit Shah) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्यात 26 सप्टेंबरला एक महत्वाची बैठक झाली होती. यामध्ये नक्षल (Naxalite) प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. तसेच गृह मंत्रालयाचे सुरक्षा सल्लागार, आयबी प्रमुख, तसेच राज्यांचे पोलीस महासंचालक देखील होते.

या बैठकीनंतर 2 ऑक्टोबरला सीपीआय (एम) च्या मुख्य संघटनेकडून एक पत्र जारी करण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, आम्हाला अमित शाह आणि अजित डोवाल यांचा प्लॅन माहिती आहे. ते दोघेही नक्षलवाद्यांविरोधात कोणते ऑपरेशन सुरु करणार आहेत याचीही कल्पना आहे. आम्ही परदेशांत राहणाऱ्या समर्थकांना मदत करण्याची विनंती करत आहोत. इंडियन पीपल वॉरला ताकद देण्यासाठी पुढे यावे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, अमित शाहंसोबतच्या बैठकीत गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, गृह सचिव अजय भल्ला देखील होते, हे आम्हाला माहिती आहे. गृह मंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांना वर्षाच्या आत संपविण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. तो वेळेच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एवढेच नाही तर नक्षलवाद्यांना हे देखील माहिती आहे की, अमित शाहंनी संरक्षण दलाला वाटेल तेवढा पैसा आणि अतिरिक्त जवान देण्याचे आश्वासन दिले आहे. शाह यांच्या या प्लॅनला उत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या सेंट्रल रिजनल ब्युरोने आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडिसा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आपल्या संघटनांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नक्षलवाद्यांनी अजित डोवाल यांच्याबाबतही उल्लेख केला आहे. डोवाल यांनी मिलिट्री ऑपरेशन प्रहार सुरु केले होते. हे ऑपरेशन नोव्हेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये राबविण्यात आले होते. नक्षलवाद्यांनी या ऑपरेशनमध्ये आपण जिंकल्याचा दावा केला आहे.

नक्षलवाद्यांनी केंद्रीय सुरक्षा दल आणि राज्याच्या पोलिसांना मोठे नुकसान पोहोचविले आहे. या काळात 90 पोलीस मारले गेले आहेत. तर 269 जखमी झाल्याचा दावा या पत्रामध्ये नक्षलवाद्यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री देखील त्यांची हार मान्य करतात पण ते सार्वजिकरित्या बोलत नाहीत. यामुळेच त्यांनी मोठा प्लॅन तयार केला आहे.

केंद्र सरकार आर्थिक संकटांशी झगडत आहे. त्यांना असे वाटत आहे की, जोवर नक्षलवाद्यांचा खात्मा होत नाही तोवर देशात ते आपल्या देशवासियांविरोधी नीति लागू करू शकत नाहीत. सरकारच्या या ऑपरेशनला चोख प्रत्यूत्तर दिले जाईल, असा इशारा देण्य़ात आला आहे. यासाठी नक्षलवादी परदेशांतून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी मदतीची भीक मागू लागले आहेत. याबाबतचे वृत्त अमर उजालाने दिले आहे.