विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:39 IST2025-06-19T16:16:39+5:302025-06-19T16:39:26+5:30
भुवनेश्वर येथील बीजू पटनायक आतंरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो फ्लाईटला एक पक्षी धडकला. हे विमान कोलकातासाठी निघाले होते.

भुवनेश्वर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी विमानाने पक्ष्याला धडक दिल्याची आणखी एक घटना समोर आली.
या घटनेत विमानाचे किंवा कोणत्याही प्रवाशाचे कोणतेही नुकसान झाले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी इंडिगो विमानाच्या पायलटला आपत्कालीन ब्रेक लावावे लागले. पक्षी आदळल्याने त्यांना टेकऑफ रद्द करावे लागले.
भुवनेश्वरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान 6E-6101 ला भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करण्यापूर्वी एका पक्षाने धडक दिली.
वैमानिकाने तातडीने उड्डाण रद्द केले आणि सुरक्षित राहण्यासाठी आपत्कालीन ब्रेक लावले.
विमानाचे नुकसान झाले आहे का याची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेमुळे काही काळ उड्डाण ऑपरेशन विस्कळीत झाले.
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर देशातील विमान कंपन्यांनी दक्षता घेतली आहे. या आठवड्यात देशातील विमानतळांवर अनेक विमानांचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.