2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या

Published: May 17, 2021 10:28 AM2021-05-17T10:28:43+5:302021-05-17T11:04:49+5:30

2 dg medicine Price, side effect: कोरोना विरोधी औषध म्हणून 2DG हे पहिलेच औषध असून ते निर्माण करण्यास डीआरडीओच्या संशोधकांना यश आले आहे. चला जाणून घेऊया या औषधाविषयी.

2 dg medicine cost, side effect: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर मांडला आहे. या कोरोनावर 2-deoxy-D-glucose हे भारताची संस्था डीआरडीओने औषध शोधले आहे. 2DG असे या औषधाचे नाव असून आज ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते लाँच झाले आहे. ( Defence Minister Rajnath Singh and Union Health Minister Dr Harsh Vardhan release first batch of Anti-COVID drug 2DG developed by DRDO)

हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन, रेमडिसिविर, आइवरमेक्टिन सारख्या अन्य औषधांवर गेल्या वर्षीपासून संशोधन सुरु आहे. मात्र, कोरोना विरोधी औषध म्हणून 2DG हे पहिलेच औषध असून ते निर्माण करण्यास डीआरडीओच्या संशोधकांना यश आले आहे. चला जाणून घेऊया या औषधाविषयी.

2 डीजी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या इंस्टिट्यूट ऑफ न्‍यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेज (INMAS) ने विकसित केले आहे. यामध्ये हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी (DRL) च्या संशोधकांचेही योगदान आहे. डॉ. रेड्डीज सामान्य लोकांसाठी हे औषध बनविणार आहे. हे औषध पावडरच्या रुपात असणार आहे.

गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हाच INMAS च्या वैज्ञानिकांनी यावर काम सुरु केले होते. मे 2020 मध्ये डीसीजीआयने या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली होती. ही चाचणी ऑक्टोबरपर्यंत सुरु होती. नोव्हेंबर 2020 मध्ये तिसऱ्या टप्प्याला परवानगी मिळाली. आता आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे.

2 डीजी हे औषध 2डीजी अणूचे परिवर्तीत रुप आहे. जे ट्युमर, कॅन्सरच्या पेशींवर उपचारासाठी वापरले जाते. चाचणीमध्ये 2 डीजी कोरोना रुग्णांवर परिणामकारक असल्याचे समोर आले. तसेच हे औषध हॉस्पिटलाईज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनवरील अवलंबित्वदेखील कमी करते.

INMAS चे संचालक डॉ. अनिल मिश्रा यांच्यानुसार 2 डीजी हे औषध आपलीच कॉपी बनविणाऱ्या व्हायरसला पकडते. व्हायरसचा कोणताही व्हेरिअंट असुदे त्याला भूक लागते. ही भूक शमविण्यासाठी तो पुढे येईल तेव्हा 2डीजी औषध त्याला जखडेल.

व्हायरस वेगाने वाढू लागल्याने रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासू लागते. मात्र, हे औषध व्हायरसला वाढण्यापासून रोखत असल्याने आपोआपच रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार नाही.

एका पाकिटात हा डोस मिळेल. कोरोना रुग्णाला ओआरएस जसे पाण्यात मिसळतात आणि पितात तसेच प्यावे लागणार आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी हे औषध 5-7 दिवस घ्यावे लागणार आहे, असे डॉ. सुधीर चंदना यांनी सांगितले.

किंमतीबाबत अद्याप काही जाहीर झालेले नाही. ते आज जाहीर होणार आहे. चंदना यांच्यानुसार किंमतीचा निर्णय डॉ. रेड्डीज कंपनी घेणार आहे. मात्र, हे औषध परवडणारे असेल यावर लक्ष दिले जाईल. सुत्रांनुसार एका पाकिटाची किंमत ही 500 ते 600 रुपयांदरम्यान असणार आहे.

चाचणीवेळी सामान्य कोरोनाबाधित आणि गंभीर रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, सर्व रुग्णांना याचा फायदा झाला. सर्वांमध्ये प्रतिकूल प्रभाव दिसला. २जीडीचा कोणताही साईड इफेक्ट नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे त्या म्हणाल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!