२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 10:31 AM2020-06-05T10:31:47+5:302020-06-05T10:53:28+5:30

योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आज देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

सध्याच्या भारतीय राजकारणातील वादग्रस्त पण उत्तर भारतात तितकेच लोकप्रिय असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज वाढदिवस.

५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमधील पौढी गढवाल जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. अजयसिंह बिष्ट हे त्यांचे मूळ नाव. पण गोरखपूरला आल्यावर त्यांचे योगी आदित्यनाथ असे नामकरण झाले.

योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आज देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

विद्यार्थी दशेमध्येच योगी आदित्यनाथ राम मंदिर आंदोलनात सहभागी झाले होते. त्यादरम्यान त्यांची ओळख अवैद्यनाथ यांच्याशी झाली. पुढे अवैद्यनाथ यांनी आदित्यनाथ यांना आपला वारस घोषित केले.

अभ्यासात हुशार असलेले योगी आदित्यनाथ यांचा लहानपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. त्यातूनच ते धार्मिक कार्यक्रम आणि आंदोलनांकडे आकर्षित झाले. पुढे ते महंत अवैद्यनाथ यांच्या सहवासात आले आणि १९९४ मध्ये ते गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे उत्तराधिकारी बनले.

योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.

योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनीने गोसेवा आणि हिंदू विरोधी कृत्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम सुरू केले. त्यामुळे गोरखपूरमध्ये योगी आणि त्यांच्या संघटनेला कुणी प्रतिस्पर्धी उरला नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांचे एन्काऊंटर करण्याच्या निर्णयावर चौफेर टीका झाली होती. तसेच गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या मुलांच्या मृत्यूंमुळे योगी टीकेचे लक्ष्य बनले होते.

तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीदरम्यान त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीका झाली. विशेषकरून राज्यातील मनुष्यबळ हवे असल्यास त्यासाठी राज्य सरकाची परवानगी घेण्याची भूमिका असो वा प्रियंका गांधींसोबत झालेला बस विवाद योगींवर चौफेर टीका झाली.