२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:27 IST2025-04-11T17:17:58+5:302025-04-11T17:27:30+5:30

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढून मुंबईकरांचे प्राण वाचवले आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात मोलाची भूमिकाही पार पाडली. कोण आहेत मराठमोळे अधिकारी?

Sadanand Date Plays Role In 26/11 Mumbai Attack Accused Tahawwur Rana Extradition to India: मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून गुरुवारी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. यासंदर्भात २०१० पासून अर्थात गेल्या १५ वर्षांपासून भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश आले. राणाला घेऊन आलेले अमेरिकेचे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरले. तिथून त्याला थेट एनआयएच्या कार्यालयात नेऊन नंतर पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले.

दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अमेरिकेसह आणखी काही देशांचेही नागरिक होते. तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकी न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन है आता राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वतीने दिल्लीतील न्यायालयातसुद्धा राणासंदर्भातील खटल्यात सरकारची बाजू मांडत आहेत. त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेशी कृष्णन हे २०१० पासून संलग्न आहेत. तर तहव्वूर राणाच्या वतीने वकील पीयुष सचदेवा बाजू मांडत आहेत.

पातियाळा न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले. रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती. अखेर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे. २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. जीवाची बाजी लावून मुंबईकरांचे रक्षण केले. या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या कसाबला जीवंत पकडले. या सगळ्यात अनेक पोलिसांचा सहभाग होता. अनेक पोलिसांनी हौतात्म्य पत्करले. यात असे एक मराठमोळे अधिकारी होते, ज्यांनी दहशवादी हल्ल्यात छातीचा कोट करून लढ दिला, कसाबला फाशी देण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणातही महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबईवर २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात २१ नोव्हेंबर २०१२ फासावर चढवण्यात आले. आर्थर रोडवरून कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यासाठी मोहिम राबवण्यात आली होती. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्त्व त्यावेळी पोलीस अधिकारी सदानंद दाते केले होते. त्याच सदानंद दातेंच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) तहव्वूर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणले आहे.

NIA महासंचालक असलेले सदानंद दाते मुंबई हल्ल्यात दहशवाद्यांशी दोन हात करताना जखमी झाले होते. पण त्यांनी अनेकांचे जीव वाचवला होता. राष्ट्रपतींकडून कसाबची दयायाचना नऊ नोव्हेंबर २०१२ रोजी फेटाळण्यात आल्यानंतर १२ नोब्हेंबर २०१२ रोजी सत्र न्यायालयाने कसाबचे मृत्यू वॉरंट काढण्यात आले. वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीनंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी त्यावेळचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

तत्पूर्वी त्यांनी तपास अधिकारी रमेश महाले यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून कसाबबाबत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेची तयारी करण्यास सांगितले. त्यानुसार १९ नोव्हेंबर १०१२ ला महालेंना दाते यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानुसार सहा गाडया तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील एका मोटरगाडीत बसून रमेश महाले व तत्कालीन कारागृह अधिकारी विनोद लोखंडे थेट आर्थर रोड तुरुंगाच्या यार्ड क्रमांक १२च्या खाली गेले. त्या वेळी कसाबच्या विशेष सेलमध्ये जाऊन महालेंनी कसाबला विचारले, क्या कसाब पहचाना क्या?

त्यावर कसाबने महाले साहेब असे उत्तर दिले. नंतर मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी कसाबला वाहनात बसवून त्याच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला. मग कसाबला येरवडयात घेऊन जाणा-या ताफ्यातील प्रवासावर सदानंद दाते लक्ष ठेऊन होते. या संपूर्ण प्रवासातील सहा टप्प्यांना इंग्रजीच्या बाराखडीनुसार ए ते एफ पर्यंत सांकेतिक नावे देण्यात आली होती. उदा. अल्फा (आर्थर रोड), येरवडा (फॉक्स). सर्व संवाद हे फोर्सवनच्या बिनतारी संचावरून केले जात होते. प्रत्येक टप्प्यानुसार बिनतारी संदेश देणारा केवळ सांकेतिक शब्द म्हणजेच अल्फा उच्चारायचा. त्यानुसार कसाब कुठे पोहोचला याची माहिती दाते यांना मिळत होती.

ही संपूर्ण मोहिम अत्यंत गुप्ततेने राबवण्यात आली. २० नोव्हेंबर २०१२च्या पहाटे हा फौजफाटा कसाबला घेऊन येरवड्याला पोहोचला. २१ नोव्हेंबर २०१२ ला कसाबला फासावर चढवण्यात आले. कसाबला फासावर चढवण्याच्या या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्त्व करणारे सदानंद दाते आता एनआयएच्या महासंचालक पदी कार्यरत आहेत.

मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी डॉक्टर व रुग्णांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी दाते एक पथकासह कामा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी दाते यांनी दहशवाद्यांच्या अद्यायावत एके-४७ चा सामना केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र त्यांनी रुग्णालयातील अनेक कर्मचारी आणि रुग्णांचे जीव वाचवले.

परळ येथील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी रुग्णालयाबाहेर दाते यांच्या नावाचा जयघोष केला होता. सदानंद दाते यांना त्यांच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

दरम्यान, दिल्लीतील न्यायालयात राणाविरोधात बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांचे नेतृत्व दयान कृष्णन करणार असून, त्यांना विशेष सरकारी वकील नरेंद्र मान साहाय्य करणार आहेत. शिवाय संजीव शेषाद्री व मराठी वकील श्रीधर काळे हेही सरकारी वकिलांच्या या चमूत असतील.

तहव्वूर राणा हा मुंबईत आला व त्याने ताजमहाल हॉटेलमध्ये वास्तव्य केले. २६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या व अन्य अनेक ठिकाणांवर हल्ले केले. एका धर्माच्या प्रेषिताची व्यंगचित्रे छापणाऱ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर झालेल्या हल्लाप्रकरणी तहव्वूर राणा, डेव्हिड कोलमन हेडली या दोघांना अमेरिकी पोलिसांनी अटक केली.

१६ मे २०११ रोजी तहव्वूर राणा याच्याविरोधात अमेरिकी जिल्हा न्यायालयात खटला सुरू झाला. ९ जून २०११ रोजी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यासाठी माहिती तसेच अन्य मदत पुरविल्याच्या आरोपातून त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. १० जून २०११ रोजी राणाची निर्दोष मुक्तता झाल्याने भारताची तीव्र नाराजी.

मार्च-एप्रिल २०१६ मध्ये मुंबई हल्ल्यात तहव्वूर राणाने बजावलेल्या भूमिकेबद्दलची माहिती डेव्हिड कोलमन हेडली याने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयाला दिली. २१ जानेवारी २०२५ रोजी भारतात प्रत्यार्पण करण्याविरोधात राणाने केलेली याचिका अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. १० एप्रिल २०२५ रोजी तहव्वूर राणा याला भारतात दिल्लीमध्ये आणण्यात आले.

भारत-अमेरिकेत झालेल्या प्रत्यार्पण करारांतर्गत राणाला अमेरिकेतील न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. त्याने प्रत्यार्पण टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरले; पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. आता सर्वच स्तरातून कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.