11 वर्षांचा मुलगा यूट्यूबवर शिकला हॅकिंग, अश्लील फोटो व्हायरल करायची धमकी देत वडिलांना मागितली 10 कोटींची खंडणी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 28, 2021 05:07 PM2021-01-28T17:07:26+5:302021-01-28T17:15:48+5:30

पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षांच्या मुलांकडून आपण काय काय करायची अपेक्षा ठेऊ शकता? उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका 11 वर्षांच्या मुलाने असा गुन्हा केला आहे, जो ऐकूण प्रत्येक जण हैराण आहे.

हा मुलगा यू-ट्यूबवरून हॅकिंग करायला शिकला आणि त्याने आपल्या वडिलांनाच ईमेल पाठवून चक्क 10 कोटी रुपायांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, ज्या आयपी अॅड्रेसवरून ईमेल पाठवण्यात आला होता, तो पीडित वडिलांच्या घरातलाच असल्याचे उघडकीस आले. तर जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण...

गेल्या आठवड्यापूर्वी गाझियाबादमधील एका व्यक्तीला अचानक धमकीचा ईमेल आला. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. यासोबतच 10 कोटी रुपये दिले नाही, तर तुमचे अश्लील फोटो सार्वजनिक करू, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच, हा मेल एका हॅकर्स ग्रुपकडून पाठविण्यात आला असल्याचा दावाही यात करण्यात आला होता.

पीडित व्यक्ती गाझियाबादमधील वसुंधरा कॉलनीतील आहे. धमकी असलेल्या या इमेलमध्ये स्पष्ट पणे लिहिण्यात आले होते. की 10 कोटी रुपये दिले नाही, तर तुमचे अश्लील फोटो आणि घरातील सदस्यांची खासगी माहिती इंटरनेटवर व्हायरल करण्यात येतील.

यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली. यावेळी, त्यांनी सांगितले, की त्यांचा ईमेल आयडी 1 जानेवारीला हॅक करण्यात आला होता. हॅकर्सने त्यांच्या ईमेल आयडीचा पासवर्ड बदलला. तसेच मोबाईल नंबरसोबतही छेडछाड केली. यानंतर त्याने 10 कोटी रुपये देण्यासाठी धमीचा ईमेल पाठवला.

पीडित व्यक्तीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितले होते, की हॅकर्सचे त्यांच्या दैनंदीन कामावरही लक्ष आहे. सातत्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवरत तपासाला सुरुवात केली.

सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संबंधित ईमेल कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरून पाठवण्यात आला याचा तपास केला. या तपासात पोलिसांच्या हाती जी माहिती आली त्याने त्यांनाच मोठा धक्का बसला.

कारण संबंधित धमकीचा ईमेल ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून पाठवण्यात आला होता. तो तक्रादार व्यक्तीच्या घरातीलच होता.

यानंतर पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीच्या घरच्यांची चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीच्या 11 वर्षीय मुलाची चौकशी केली असता त्या मुलाने आपला गुन्हा कबूल केला.

याशिवाय यूट्यूबवर आपण हॅकिंग शिकल्याची कबुलीही संबंधित मुलाने पोलिसांना दिली.

या मुलाला काही दिवसांपूर्वी कम्प्युटर क्लासदरम्यान सायबर क्राईम म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे हे शिकविण्यात आले होते.

आता पोलीस, हा मुलगा आपल्या वडिलांसोबत असा का वागला? याचा तपास करत आहेत.

या मुलाने यूट्यूबवर हॅकिंगशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले. कशा प्रकारे ईमेल तयार करावा. सायबर क्राईम कशा प्रकारे करावा. अशी सर्व माहिती मिळवल्यानंतर, या मुलाने आपल्या वडिलांचाच ईमेल आयडी हॅक केला. यानंतर तो त्यांना वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून धमकीचे ईमेल पाठवत होता.

Read in English