कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 03:38 PM2020-09-11T15:38:46+5:302020-09-11T15:48:03+5:30

महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या, फुलांचा वर्षाव करणाऱ्या व घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या नागपूरकरांना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला.

शुक्रवारची सकाळ तपस्या या आयुक्त निवास स्थानसमोर वेगळीच उजाडली होती. काहीशी खिन्न तर बरीचशी आक्रमक. कारण, नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते.

त्याकरिता त्यांना निरोप द्यायला गुरुवारपासूनच त्यांच्या द्वारी रीघ लागलेली होती.. कुणी पुष्पगुच्छ आणत होते.. कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते.. तर कुणी त्यांना राखी बांधत होते.. तर कुणी काही भेटवस्तूही आणताना दिसत होते.

जो तो आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करीत होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच मुंढे यांच्या निवासस्थानासमोर गर्दी जमू लागली होती. पाहता पाहता ती वाढू लागली.

तुकाराम मुंढे परत या अशा घोषणा हवेत निनादू लागल्या.. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही हजर झाले होते. पोलीस बंदोबस्तही तगडा होता. शेवटी साडेदहाच्या सुमारास तुकाराम मुंढे बाहेर आले.

उपस्थित नागरिकांना त्यांनी अभिवादन केले व ते गाडीत बसले.. त्यांच्या गाडीवर फुलांचा, घोषणांचा, गुलालाचा वर्षाव करण्यात आला. उपस्थित पोलिसांनी त्यांना अभिवादन केले... त्याचा स्वीकार त्यांनी केला.. आणि ते विमानतळाकडे रवाना झाले.

नागपुरात याआधी कोणत्याही आयुक्तांना अशा प्रकारने नागपूरकरांचे प्रेम मिळाले नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

तुम्ही मला इतकं प्रेम दिलंत, निरोप देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात.. मी सगळ््यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही माझ्या मनात कायम रहाल. नागपूरकरांचे प्रेम अविस्मरणीय आहे.

मी माझे काम करीत राहीनच. माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं १०० टक्के काम मी केलं आहे. हे शहर तुमचं आहे.. त्याला चांगलं बनवण्यात तुमचा वाटा मोलाचा आहे. शहरातील समस्या ओळखा व त्यावर काम करा. संघटित रहा.. जयहिंद, असे मुढेंनी म्हटले.

तुकाराम मुंढे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून झाली खरी; पण त्याठिकाणी रुजू होण्याआधीच तीदेखील रद्द करण्यात आली आहे.

त्यांना आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा असेल, तर ज्येष्ठ सनदी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांची गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (अपिले आणि सुरक्षा) या पदावर बदली करण्यात आली.

तुकाराम मुंढे हे जीवन प्राधिकरणात रुजू होण्यापूर्वीच त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.

मुंढे यांची २७ ऑगस्टला नागपूर महापालिका आयुक्त पदावरून जीवन प्राधिकरणात बदली करण्यात आली होती.