Ajit Pawar Plane Crash Case : 'फाईल, फोन आणि फ्लाईट'चे गूढ कनेक्शन काय? अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:28 IST2026-02-13T09:04:56+5:302026-02-13T10:28:44+5:30
Ajit Pawar Plane Crash Case : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आरोप करत तपास करण्याची मागणी केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आता तपास करण्याची मागणी वाढली आहे. आमदार रोहित पवार यांनी विमान अपघात प्रकरणी नवीन प्रश्न उपस्थित केल्याने संशय वाढला आहे, या प्रकरणाची आता चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या आदल्या दिवशी ते मुंबईत होते. त्या रात्री नेमके काय घडले यावर आता रोहित पवारांनी मुद्दे उपस्थित केले आहेत. अजित पवार यांना एका सहीसाठी थांबवणे, एका नेत्याचा फोन येणे, कारने जाण्याच्या प्लानमध्ये बदल करणे यावर आता रोहित पवारांनी संशय व्यक्त केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे आता राज्यात खळबळ उडाली आहे. आमदार पवार यांनी नाव न घेता पटेल यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी संशयही उपस्थित केला आहे. दरम्यान, काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनीही प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला होता असे वक्तव्य केले आहे.

फोन , फ्लाईट आणि फाईल या तीन मुद्द्यांच्या आरोपांवरून या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार यांना एका नेत्याचा फोन आला, या फोनमुळे त्यांना उशीर झाला. या फोनमुळेच प्रवासाचा निर्णय बदलला का?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार कारने बारामतीला जाणार होते. पण, अचानक आलेल्या या फोनमुळे निर्णय बदलल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांनी'बाय-रोडने जाण्याची तयारी केली होती. पण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी त्यांना फोन आला होता, असा दावा प्रमोद हिंदूराव यांनी केला. या दाव्यामुळे आणि रोहित पवार यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

प्रमोद हिंदूराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आहेत. यामुळे त्यांनीच केलेल्या या दाव्यामुळे अपघाताचे प्रकरण घातपाताच्या वळणावर जाताना दिसत आहे.

तर दुसरीकडे रोहित पवार यांनीही, एका वरिष्ठ नेत्यानं फाईल क्लिअर करण्यासाठी आग्रह धरला होता आणि ती फाईल येईपर्यंत उशीर झाल्याने विमानाने जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा केला आहे. यामुळे आता फोन,फाईल, फ्लाईट या मुद्द्यांचा तपास करण्याची मागणी होत आहे.

अजित पवारांनी भंडारा-गोंदियातील राईस मिलशी संबंधित फाईलवर शेवटची सही केली होती. आणि तीच फाईल आणण्यासाठी साडेसात ते आठ वाजले होते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

















