राज ठाकरे आता काय करणार?; 'इंजिन' कुठल्या दिशेने धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:14 PM2019-05-27T17:14:25+5:302019-05-27T17:34:37+5:30

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज ठाकरे 'गायब'च आहेत. २३ मे रोजी भाजपा आणि एनडीएचे आकडे पाहून त्यांनी 'अनाकलनीय' या एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली होती. ते माध्यमांपुढे येतील, बोलतील, अशी आशा मनसैनिकांनाही होती. पण अजून तरी तसं झालेलं नाही. मात्र त्याचवेळी, राज यांचं राजकारण आता कोणत्या दिशेनं जाईल, यावर वेगवेगळ्या स्तरांमध्ये चर्चा सुरू आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या त्वेषाने भाजपाविरोधात प्रचार केलाय, तो पाहता आता त्यांना 'साईड चेंज' करता येणार नाही. म्हणजेच, त्यांना एक तर विरोधकांसोबतच राहावं लागेल किंवा स्वबळावर पुढे जावं लागेल, हे नक्की आहे. पण, हे दोन्ही मार्ग त्यांच्यासाठी खडतरच दिसत आहेत.

लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. अर्थात, हे मतदान नरेंद्र मोदींकडे पाहून झालं. त्यामुळे विधानसभेतही अगदी तसंच चित्र दिसेल, असं म्हणणं घाईचं आणि एकांगी ठरेल. परंतु, काँग्रेसची संघटना खिळखिळी झालीय आणि राष्ट्रवादीची 'पवार पॉवर'ही क्षीण झालीय. नवमतदारांवर 'मोदी मॅजिक'चं गारुड आहे. अशावेळी, या दोन पक्षांसोबत जाणं राज यांना कितपत फायद्याचं ठरेल, याबद्दल शंकाच वाटते.

गेल्या अनेक निवडणुकांप्रमाणे, विधानसभाही स्वबळावर लढायची झाल्यास राज यांना नवा मुद्दा घेऊन रिंगणात उतरावं लागेल. मोदींवर टीका करत राहून फायदा नाही. त्याऐवजी सकारात्मक, मनाला भिडेल, पटेल असा मुद्दा घेऊन जनतेत जावं लागेल.

मराठी आणि भूमिपुत्र या मुद्द्यांनी मनसेला चांगली साथ दिली. पण, आता त्यांची ताकद असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि अन्य प्रांतातील लोक राहतात. त्यांना 'मनसे स्टाईल' हिसका दाखवायला गेल्यास त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो.

आपल्या करिष्म्यावर जिंकू, हा समजही आता राज ठाकरेंनी दूर ठेवायला हरकत नाही. कारण, मोदींच्या करिष्म्यापुढे भले-भले फिके पडल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे राज्य सरकारच्या त्रुटी, अपयश दाखवून देण्यात, पटवून देण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, यावर बरंच काही अवलंबून आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी करणं अपरिहार्य आहे. शिवसेनेने जात-पात मानली नाही, पण सगळ्यांना आपल्यासोबत जोडलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे शिवसेना नेते पाहिले तर त्याचा अंदाज येईल. ते राज यांना अद्याप जमलेलं नाही.

राज यांच्यापुढे आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, हा फॉर्म्युला घेऊन मनसेची पूर्णपणे नवी प्रतिमा तयार करणं. या फॉर्म्युल्यानेच शिवसेनेची मूळं घट्ट केली होती आणि त्याची फळं आज त्यांना मिळत आहेत. परंतु, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

राज यांच्याकडे एक अस्त्र आहे, ते म्हणजे व्यंगचित्रांचं. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी मोदी सरकारला त्यांनी या रेषांमधून 'फटकार'लं होतं. या व्यंगचित्रांना तुफान प्रतिसादही मिळाला होता. परंतु, त्यातही सातत्य राहिलं नाही. विधानसभेत या रेषांचा प्रभावी वापर करून ते 'इंजिना'ला दिशा देऊ शकतात.