कौतुक करावं तेवढं कमी! देशाची ८०% स्ट्रॉबेरी पिकवतंय महाराष्ट्राचं 'हे' शहर; परदेशातही वाढलीये क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 20:48 IST2026-02-09T20:45:09+5:302026-02-09T20:48:52+5:30
सर्वांनाच भुरळ घालणारं स्ट्रॉबेरी हे फळ नक्की येतं कुठून? हा प्रश्न अनेकांना पडतो. तर याचं उत्तर आपल्या महाराष्ट्रातच दडलंय.

थंडीचा कडाका वाढला की बाजारात लालचुटूक, रसरशीत आणि सुगंधी स्ट्रॉबेरी दिसू लागते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालणारं हे फळ नक्की येतं कुठून? हा प्रश्न अनेकांना पडतो. तर याचं उत्तर आपल्या महाराष्ट्रातच दडलंय.

सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य महाबळेश्वर हे शहर आज 'भारताची स्ट्रॉबेरी राजधानी' म्हणून ओळखलं जात असून, देशाच्या एकूण गरजेपैकी तब्बल ८० टक्के स्ट्रॉबेरी एकट्या महाबळेश्वरमधून पुरवली जाते.

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी इतकी खास असण्यामागे तिथलं हवामान आणि माती कारणीभूत आहे. स्ट्रॉबेरीसाठी १० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. महाबळेश्वरच्या थंड रात्री आणि हलकं ऊन या पिकासाठी वरदान ठरतं.

महाबळेश्वरमधील लाल लॅटराइट माती स्ट्रॉबेरीच्या गोडव्याला आणि रंगाला अधिक उठाव देते. या मातीत पाणी साचून राहत नसल्याने मुळं कुजण्याची भीती नसते, ज्यामुळे फळांचा दर्जा टिकून राहतो.

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीच्या विविध जातींची लागवड केली जाते. यामध्ये मोठ्या आकाराची आणि रसरशीत 'चांडलर' ही जात पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. लवकर येणारी आणि अतिशय गोड अशी 'स्वीट चार्ली' आणि लांबच्या प्रवासातही खराब न होणारी 'कॅमारोसा' या जातींची मागणी परदेशातही मोठी आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या पिकाची लागवड होते आणि डिसेंबर ते मार्च या काळात उत्पादन हाती येते. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये स्ट्रॉबेरीचा हंगाम ऐन भरात असतो. महाबळेश्वरमधील हजारो शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनला आहे.

मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या मेट्रो शहरांच्या बाजारपेठांसोबतच ही स्ट्रॉबेरी आता प्रोसेस्ड स्वरूपात थेट सातासमुद्रापार निर्यात केली जात आहे.

आज महाबळेश्वरची ओळख केवळ फिरण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर इथल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीने आणि निसर्गाच्या सोबतीने या हिल स्टेशनला 'ग्लोबल स्ट्रॉबेरी हब' बनवलं आहे.

















