मुंबई-पुणे हायवेवर ३२ तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या १ लाख लोकांना सरकार देणार ५.२ कोटी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 09:18 IST2026-02-22T09:11:51+5:302026-02-22T09:18:24+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ३ फेब्रुवारी रोजी गँस टँकर पलटी झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. जवळपास ३२ तासाहून अधिक तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांसह लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. आता या वाहतूक कोंडीत अडकलेल्या १.२ लाख वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

३ फेब्रुवारीला वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना लवकरच टोल रिफंड मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनुसार, या सर्व वाहन चालकांना एकूण ५.१६ कोटी रुपये रक्कम परत केली जाणार आहे. हा परतावा एक्सप्रेस वे तसेच पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वसूल केलेल्या टोलवर लागू असेल.

महामार्गावरील अपघातानंतर टोल वसुली थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही ज्या चालकांचे फास्टॅगमधू पैसे कापले गेले त्यांचा डेटा गोळा करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात ही रक्कम संबंधित चालकांच्या फास्टॅग खात्यात थेट जमा केली जाईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेनंतर महामंडळाने टोलमध्ये सवलती देणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून सविस्तर माहिती मागितली. विशेषतः निर्देश जारी झाल्यानंतरही टोल वसुली सुरू का राहिली याबद्दलही स्पष्टीकरण मागितले. टोल प्लाझा येथील बॅरिकेट्स पूर्णपणे उघडेपर्यंत काही व्यवहार असेही असू शकतात ज्यामध्ये स्वयंचलित प्रणालीने फास्टॅगमधून टोल कापला असेल असं अधिकाऱ्यांना वाटते. अशा सर्व प्रकरणांची ओळख पटवण्यात आली आहे आणि परतफेड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

३ फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे २०-२२ किमी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न किंवा इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले होते.

वाहतूक कोंडीत लोकांचे हाल पाहता प्रशासनाने तात्पुरते टोल वसुली थांबवण्याचा निर्णय घेतला होता. वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या वाहनचालकांना पैसे परत करणे याला आता प्राधान्य दिले आहे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने असे म्हटले आहे.

परतफेड थेट डिजिटल पद्धतीने केली जाईल त्यामुळे चालकांना वेगळे दावे दाखल करावे लागणार नाहीत. भविष्यात अशा परिस्थितीत अनावश्यक कपात टाळण्यासाठी समन्वय आणि तांत्रिक व्यवस्था आणखी सुधारल्या जातील असं अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने सुरक्षा कारणास्तव वाहतूक बराच वेळ थांबवण्यात आली होती. तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा टँकर बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले. परंतु या ३२ तासांत अनेक वाहने रस्त्यावर अडकली होती. त्यात लहान बालकांपासून वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाल्याने त्या ठिकाणी गॅसच्या लिकेजचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर पुणे लेनची बाजू खालापूर टोल प्लाझापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतूक कोंडीची तात्काळ दखल घेत राज्य सरकारने महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचे निर्देश दिले होते. वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल वसूल करू नये असं सरकारने बजावले होते. मात्र तरीही फास्टॅगमधून अनेक वाहनचालकांचे पैसे कापले गेले. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टोलचे पैसे परत करा अशी मागणी केली होती.