ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:33 PM2021-07-12T21:33:04+5:302021-07-12T21:35:49+5:30

भाजपनं लावून धरलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता; मागणीबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक

राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेले निर्बंध कायम आहेत. तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्य सरकारनं लागू केलेले निर्बंध मागे घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी आंदोलनंही झाली आहेत. निर्बंध हटवण्यासाठी भाजप नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत.

मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास सुरू करावा या मागणीसाठी दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दरेकरांना फोन केला.

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याची माहिती दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू देण्याबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचं दरेकर म्हणाले.

मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबद्दल सरकार सकारात्मक असून लवकरच याबद्दल दिलासादायक निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी दरेकर यांना फोन करून सांगितलं. त्यामुळे मुंबई लोकलमधील सर्वसामान्यांच्या प्रवासाबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबद्दलचं आश्वासन विरोधी पक्षनेते दरेकरांना दिलं आहे. मात्र त्यासाठी कोणतीही डेडलाईन दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री लोकलबद्दलचा निर्णय केव्हा जाहीर करणार याकडे लक्ष लागलं आहे.

राज्यात लागू असलेल्या निर्बंधांबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी काल दिले. निर्बंध कठोर करावेत किंवा सरसकट सूट द्यावी असा प्रस्ताव टोपंनी एका बैठकीत मुख्यमंत्र्यांना दिला.

मुख्यमंत्री ठाकरे निर्बंधांबद्दल लवकरच सकारात्मक निर्णय घेतील, असं टोपेंनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनबद्दल लवकरच मोठा निर्णय अपेक्षित आहे.