शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Political Crisis: BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 2:05 PM

1 / 9
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2 / 9
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना चारही बाजून घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेला एकमागून एक हादरे देत असल्याचे दिसत आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप वारंवार होत असतानाच संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली आणि जेरबंद केले. यानंतर मात्र, आता उद्धव ठाकरे यांना खिंडीत पकडून चेक देण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या वजीरालाच निशाण्यावर घेतल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
भाजप आता पुढची खेळी खेळणार असून, उद्धव ठाकरेंची महत्त्वाची प्यादी नामोहरम करण्याची मोठी चाल चालली जाणार आहे. संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले गेलेल्या एका बड्या नेत्यावर आता कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. तो बडा नेता म्हणजे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब.
4 / 9
संजय राऊत उद्धव ठाकरे यांचे उजवा हात असले, तर अनिल परब हे वजीर असल्याचे सांगितले जाते. त्यांनाच आता भाजपकडून टार्गेट केले जाऊ शकते, अशी शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या चर्चेत अनिल परब हे सर्वांत पुढे असायचे. इतकेच नव्हे तर शिवसेना संघटनेच्या कोणत्याही प्लानिंगमध्ये अनिल परब यांचा पुढाकार महत्त्वाचा मानला जातो.
5 / 9
महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये अनिल परब परिवहन मंत्री होते. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी करण्यात आलेला संप चांगल्या पद्धतीने अनिल परब यांनी हाताळल्याचे बोलले जाते. यानंतर आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनिल परब यांची भूमिका आणि सक्रीयता अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
6 / 9
अनिल परब यांना मुंबईतील शिवसेना संघटनेच्या अत्यंत बारकाईने माहिती आहे. याशिवाय मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील मतदारांची, मतांच्या गणिताची अनिल परब यांना सखोल माहिती आहे. प्रत्येकवेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनिल परब यांची स्ट्रेटेजी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. उमेदवारांची निवड, प्रचाराची रणनीती अशा सगळ्या गोष्टींमध्ये अनिल परब यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये अनिल परब शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
7 / 9
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना चितपट करण्यासाठी अनिल परब यांना जेरीस आणण्यासाठी भाजपकडून हालचाली होऊ शकतात, असे राजकीय जाणकार सांगतात. अनिल परब यांची आताच्या घडीला दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावत चौकशीला पाचारण केले होते. ईडीकडून त्यांची ११ तास चौकशी करण्यात आली.
8 / 9
शिवसेना अडचणीत असताना अनिल परब नेमके कुठे आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. अनिल परब पडद्यामगून सगळी सूत्रे सांभाळत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, काही चर्चांनुसार, संजय राऊतांनंतरच पुढचं टार्गेट हे अनिल परब असू शकतात. भाजप नेते नितेश राणे यांच्यासह अन्य काही नेत्यांनीही यासंदर्भात सूचक वक्तव्ये केलेली आहेत.
9 / 9
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेत टफ फाइट देण्यासाठी भाजपसह शिंदे गटानेही जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील बंडखोर आमदारांना शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या मुख्य संघटनेतील पदाधिकारीही आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAnil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा