शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:49 IST2025-01-22T13:40:56+5:302025-01-22T13:49:10+5:30

शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने अजित पवारांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघातील कामांच्या निमित्ताने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विविध आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याचं दिसत आहेत.

अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.

"बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले," अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.

"दादांसारखा प्रशासनावर पकड असणारा नेता पालकमंत्री झाल्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल यात शंका नाही," असा विश्वासही संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने अजित पवारांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यावर स्पष्टीकरण देत आपण ही भेट कशासाठी घेतली, याबाबतचा खुलासा क्षीरसागर यांनी केला आहे.

"मी बीड MIDC बाबत दादांशी चर्चा केली. MIDC चा विकास व्हावा जेणेकरून बीड शहरात अधिकाधिक उद्योग यावेत व त्यातून रोजगार निर्मिती होऊन जिल्हा विकासाचा वाटेवर यावा याबाबत दादांकडे काही मागण्या केल्या. दादांनी देखील सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली आहे," अशी माहिती संदीप क्षीरसागरांनी दिली आहे.