Ashok Kharat: घरी येण्याचे, पूजा करण्याचे अशोक खरात किती लाख रुपये घ्यायचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:57 IST2026-03-21T19:51:43+5:302026-03-21T19:57:19+5:30
मर्चंट नेव्हीतील २२ वर्षांचा अनुभव, कॅप्टनची प्रतिमा आणि १५ भाषांवर असलेले प्रभुत्व... या जोरावर नाशिकच्या सिन्नरमधून सुरू झालेला अशोक खरातचा प्रवास आज कोठडीच्या अंधारात पोहोचला आहे.

श्रद्धेच्या नावाखाली भीतीचा वापर करून सर्वसामान्यांपासून बड्या धेंडांपर्यंत सर्वांना लुटणाऱ्या या भोंदू बाबाचे २०० कोटींचे आर्थिक साम्राज्य आणि ५८ अश्लील व्हिडिओंचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे.

अशोक खरातने आपल्या करिअरची सुरुवात समुद्रात केली, पण खरी माया त्याने अंकशास्त्राच्या माध्यमातून गोळा केली. सिन्नरच्या कहांडळवाडीतून त्याने अंकशास्त्राचा छोटा व्यवसाय सुरू केला. मर्चेंट नेव्हीमधील अनुभवामुळे त्याचे इंग्रजी, हिंदी आणि मराठीवर उत्तम प्रभुत्व होते.

पारंपारिक ज्योतिषांपेक्षा वेगळा दिसणारा हा कॅप्टन अल्पावधीतच श्रीमंतांच्या गळ्यातील ताईत बनला. निवडणुकांचे निकाल असोत किंवा मोठे व्यावसायिक सौदे, बडे राजकारणी आणि बिल्डर खरातच्या सल्ल्याशिवाय पाऊल उचलत नसत.

सर्वसामान्यांसाठी तो उपलब्ध असला, तरी श्रीमंत क्लायंटसाठी त्याने एक्सक्लुझिव्ह मॉडेल तयार केले होते. एखाद्या मोठ्या नेत्याला किंवा उद्योजकाला जर त्याला स्वतःच्या घरी किंवा ऑफिसवर बोलवायचे असेल, तर खरात एका भेटीसाठी तब्बल ५० लाख रुपयांपर्यंत शुल्क घ्यायचा.

याच कन्सल्टन्सीच्या जोरावर त्याने नाशिक, सिन्नर, पाथर्डी, आडगाव आणि ओझरमध्ये कोट्यवधींच्या जमिनी खरेदी केल्या. शिर्डीमध्येही त्याची मोठी मालमत्ता असल्याचे तपासात समोर आले आहे.

खरातच्या साम्राज्याचा घडा एका २७ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर भरला. पतीच्या संपवण्याचे भय दाखवून आणि गुंगीचे औषध देऊन खरातने २०२२ ते २०२५ या काळात संबंधित महिलेवर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी एका पेन ड्राईव्हमधून तब्बल ५८ अश्लील व्हिडिओ जप्त केले ज्यात तो महिलांवर अघोरी पूजा करत असताना आणि त्यांचे लैंगिक शोषण करताना दिसतोय.

खरातच्या अटकेनंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांनी त्याचे मार्गदर्शन घेतल्याचे आता मान्य केले आहे, तर काहींनी त्याला फसवणूक करणारा म्हणून झटकून टाकले आहे.

















