नाशिकमधील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बडोद्याचा महाराजा बनला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:59 PM2020-03-11T12:59:01+5:302020-03-11T13:19:13+5:30

आधुनिक भारताच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या सयाजीराव गायकवाड या मराठमोळ्या राजाची गोष्ट!

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाणा गावातील गोपाळ काशिराव गायकवाड हा एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा.

अक्षर ओळखही नसलेला गोपाळ बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक घेतला जातो आणि त्याचं नामकरण होतं, 'सयाजीराव तिसरे'.

लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र गुण्यागोविंदाने नांदणे ही गोष्ट महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबाबतीत घडली. शिक्षणामुळे परकाया प्रवेश होतो याचा अनुभव घेत, शिक्षणाचे महत्त्व जाणत महाराज मोठे झाले आणि पुढे आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांनी अद्वैत योगदान दिले.

भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून महाराजांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे संस्थान नावारूपाला आलं. त्याशिवाय, संस्थानाबाहेरच्या लोकांच्या उत्कर्षासाठीही महाराजांनी प्रचंड आर्थिक मदत केली.

ज्ञानासारखे पवित्र शक्तिमान दुसरे काही नाही. राजाचा मोक्ष जनकल्याणात असतो, तसेच धर्माने गरिबांचा कैवारी बनावे. हेच परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान आहे. हे सयाजीरावांचे धर्मविचार.

ज्या काळात सरकारी खर्चाने शिक्षण देण्याची हिंदुस्थानात नव्हे, तर जगात सोय नव्हती, त्या काळात महाराजांनी सोनगड भागातील अस्पृश्य आणि आदिवासींच्या मुलांसाठी सर्वप्रथम मोफत शिक्षणाची सोय केली.

इ.स. १८९२ साली अमरेली प्रांतात सक्तीचे आणि मोफत शिक्षण सुरू केले, तर पूर्ण संस्थानात त्यांनी इ.स. १९०६ ला सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ‘बडोदे हे भारतातील महान व्यक्ती तयार करण्याचे ट्रेनिंग स्कूल व भावी स्वतंत्र भारताची प्रयोगशाळाच आहे. स्वतंत्र भारताची शासनव्यवस्था कशी असावी, याचे प्रयोग सयाजीराव महाराज करत आहेत.’

बालगंधर्व, चिंतामणराव वैद्य, कांटावाला, पितामह दादाभाई नौरोजी, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे, कवी चंद्रशेखर यांना वर्षासन अर्थात पेन्शन स्वरूपात मदत करण्याचे कामही सयाजीरावांनी दूरदृष्टी ठेवून केले.

महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लाला लजपतराय, श्यामजी कृष्ण वर्मा, जमशेटजी टाटा, राजा रवि वर्मा, कर्मवीर भाऊराव, अब्दुल करीम खाँ, पं. मालवीय, न्यायमूर्ती रानडे, पंडित शिवकर तळपदे, योगी अरविंद घोष, बॅ. केशवराव देशपांडे, खासेराव जाधव, शिल्पकार कोल्हटकर या व अनेक युगपुरुष आणि क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या सयाजीरावांचा हा वैचारिक अनमोल वारसा आजच्या वातावरणात सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारा आहे. (माहितीः धारा भांड मालुंजकर, साहित्यिका)