Sanjay Raut Villain in Mahavikas Aghadi; Why are all the leaders angry with him?
महाविकास आघाडीत संजय राऊत व्हिलन; सगळेच नेते त्यांच्यावर का चिडतात? By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:16 PM2023-05-08T15:16:13+5:302023-05-08T15:23:13+5:30Join usJoin usNext राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कायम चर्चेत राहिलेला चेहरा आहेत. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर राऊतांनी भाजपाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर महाविकास आघाडी बनवण्यासाठीही राऊत पुढे राहिले. शरद पवारांशी थेट संबंध आणि उद्धव ठाकरेंचा राऊतांवर असलेला विश्वास यामुळे संजय राऊत सातत्याने वादात राहिले. राऊत हे शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचं काम करतात असं त्यांच्यावर आरोप केला जातो. शिवसेनेत २ गट झाल्यापासून राऊत हे शिंदें समर्थकांच्या कायम निशाण्यावर राहिले आहेत. परंतु संजय राऊत आता महाविकास आघाडीतच व्हिलन ठरतायेत का? सगळेच नेते राऊतांवर का चिडतात अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या ४ दिवसांत संजय राऊतांबद्दल मविआतील प्रमुख नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडींवर संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून भाष्य करत शरद पवारांवर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही राऊतांना सुनावत तुम्ही शिंदे गटावर लक्ष दिले असते तर आज बाहेर बसण्याची वेळ आली नसती असं म्हटलं. अजित पवार भाजपात जाणार याच्या वावड्या उठल्यानंतर राऊतांनी अजितदादांवर भाष्य केले होते. तेव्हा तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहोत त्याबद्दल बोला, तुमचे मुखपत्र आहे त्यावर बोला, पण तुम्ही आमची वकिली करू नका, आम्ही भूमिका मांडायला समर्थ आहोत असं अजितदादांनी सुनावले होते. संजय राऊत यांनी चाटुगिरी आणि चोंबडेपणा बंद करावा. गांधी कुटुंबावर लाच्छंन लावणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. चोंबडेपणा थांबवावा, दुसऱ्या पक्षाबद्दल आपली मते मांडू नये. आमची भूमिका मांडायला काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांना लगावला. तर आम्हाला महाविकास आघाडी टिकवायची आहे त्यामुळे संजय राऊतांवर बोलणे मी उचित राहणार नाही असं सांगत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राऊतांना अप्रत्यक्ष इशारा दिला. राऊत सातत्याने सकाळची पत्रकार परिषद घेतात आणि विविध विषयांवर त्यांची मत मांडत असतात. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य करत राऊतांची पत्रकार परिषद दाखवणे बंद करा, रोज सकाळी ते द्वेषाच्या राजकारणाला सुरुवात करतात त्यानंतर दिवसभर त्यावर राजकारण होते असं सांगितले होते. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात संजय राऊत व्हिलन ठरतायेत, महाविकास आघाडीत राऊत प्रामुख्याने सर्वच विषयावर बोलतात. त्यामुळे घटक पक्षांची नाराजी वाढत चालली आहे. त्यामुळे राऊतांमुळे भविष्यात मविआला तडे जातील असंही मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडीअजित पवारSanjay RautMahavikas AghadiAjit Pawar