अहवाल जाहीर ! कोळसा खाणीने चंद्रपूरमधील २१० तर यवतमाळ जिल्ह्यात त्याहीपेक्षा जास्त गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:45 IST2026-02-06T19:36:48+5:302026-02-06T19:45:30+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कोळसा खाणींमुळे थेट व अप्रत्यक्षरीत्या बाधित झालेल्या गावांचे नकाशांकन पूर्ण करण्यात आले. बाधित गावांची अधिकृत यादी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील २१० गावांची नोंद झाली आहे.

कोळसा खाणींमुळे प्रभावित क्षेत्रे व गावे निश्चित करण्यासाठी थेट व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रांचे नकाशांकन व गावांची यादी तयार करणे हा प्रकल्प राबविण्यात आला. यासाठी ११ एप्रिल २०२५ अन्वये मान्यता मिळाली होती. केंद्र शासनाच्या १५ जानेवारी २०२४ च्या सुधारित जिल्हा खनिज प्रतिष्ठान मार्गदर्शक सूचनेनुसार खाणींच्या सभोवताल १५ किलोमीटरचा परिघ निश्चित करून ही प्रक्रिया पूर्ण झाली.

या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यातील ३०७ गावे, चंद्रपूर जिल्ह्यातील २१० गावे व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील ५४ गावे कोळसा खाणींच्या प्रभावाखाली येत असल्याची नोंद करण्यात आली. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व कोरपना तालुक्यांतील अनेक गावांचा यादीत समावेश आहे.

तालुकानिहाय बाधित गावे - वरोरा ०९, भद्रावती ५३, चंद्रपूर ३०, बल्लारपूर ०२, राजुरा १०, कोरपना १०४, जिवती ०२

ही आहेत बाधित गावे - चंद्रपूर तालुक्यातील उर्जाग्राम, साखरवाही, ताडाली, चारगाव, मोरवा, घुगुस, खुटाळा, चिचोली, सोनेगाव, पिपरी, धानोरा, उसगाव, देवाडा ही गावे बाधित म्हणून नोंद झाली. राजुरा तालुक्यातील दिर्सी, निरी, साखरी, कुरी, मार्डा, किंबोडी, पेलूर, तर कोरपना तालुक्यातील भोयेगाव, भारोसा, एकोडी, इरई, बोरगाव, जैतापूर, जिबलगुडा, नांदगाव, खैरगाव, विरूर, सोनुर्ली, गाडेगाव, सांगोडा, अंतरगाव, वनोजा, हिरापूर, आवारपूर, कोल्हापूर गुडा, पालगाव, तळोधी, नवेगाव, निमनी, बाखर्डी, धुनकी, कारवा, लखमापूर अन्य अशा एकूण २१० खाण बाधित गावांचा समावेश आहे.