शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत दबावतंत्र! फडणवीसांचं 'वेट अँन्ड वॉच'; शिंदेसेनेची दुहेरी रणनीती, भाजपावर भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:54 IST

1 / 10
राज्यातील महापालिका निकालानंतर शिंदेसेना-भाजपा यांच्यात काही आलबेल आहे असं चित्र दिसत नाही. मुंबईत ८९ जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला असला तरी शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांना सोबत घेतल्याशिवाय भाजपाला त्यांचा महापौर बसवणे कठीण आहे. त्यातच निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी त्यांच्या २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून तिथेच ठेवले त्यावरूनही अनेक तर्क वितर्क लढवले गेले.
2 / 10
महापालिका निवडणूक पाहिली तर त्यात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली वगळता राज्यात कुठल्याही प्रमुख महापालिकेत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतले नाही. नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना वेगवेगळे लढले. त्यात शिंदेसेनेला फार मोठं यश मिळवता आले नाही.
3 / 10
महापालिका निवडणुकीच्या निकालात मुंबईत ९० जागा लढवून शिंदेसेनेने २९ जागा जिंकल्या. ठाण्यात शिंदेसेनेने ७५, कल्याण डोंबिवली महापालिकेत ५३ जागा जिंकल्या. आता या महापालिकेत महापौरपदावरून शिंदेसेना आग्रही असल्याचं बोलले जाते. त्यात मुंबईत महापौर पद शिंदेसेनेला देण्यासाठी भाजपा उत्सुक नाही. त्यामुळे शिंदेसेना दबावतंत्राचा वापर करतेय का अशीही चर्चा सुरू झाली आहे.
4 / 10
त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा-शिंदेसेना एकत्रित निवडणूक लढली. तिथे भाजपाला ५० आणि शिंदेसेनेला ५३ जागा मिळाल्या. केडीएमसीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले परंतु याठिकाणी भाजपाची वाढलेली नगरसेवक संख्या भविष्यात शिंदेंसाठी धोक्याची ठरू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत भाजपाला दूर ठेवत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसत आहे.
5 / 10
कल्याण डोंबिवलीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ६२ नगरसेवकांची गरज आहे. त्यात मनसेचे ५ नगरसेवक, उद्धवसेनेचे ११, काँग्रेस २ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा १ नगरसेवक निवडून आला आहे. त्यात उद्धवसेनेचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल आहेत ते शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. मात्र त्याआधीच मनसे आणि शिंदेसेना एकत्र आल्याचं जाहीर करण्यात आले आहे.
6 / 10
मनसेच्या पाठिंब्यावर शिंदेसेना कल्याण डोंबिवलीत महापौरपद मिळवण्यासाठी खेळी करत आहे. त्यातून शिंदेसेनेचे ५३, मनसेचे ५ आणि ठाकरेंकडील संपर्कात असलेले ४ अशी बेरीज ६२ पर्यंत जाते. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत शिंदेसेना कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करणार का हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदेसेनेच्या या खेळीने एकाच वेळी भाजपा आणि उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.
7 / 10
आता शिंदेंच्या या खेळीवर प्रश्न विचारला असता भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी सूचक विधान केले. भाजपा हा एवढा विशाल पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबाबत कुणी काय बोलू शकत नाही. भाजपा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांच्या खेळी, डावपेच हे भाजपासाठी दुय्यम ठरतात. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी जर खेळी केली तर काय होते महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांना ज्यांनी राजकीय दृष्ट्‍या चित केले तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार? असा इशाराच अप्रत्यक्षपणे दरेकर यांनी शिंदेसेनेला दिला.
8 / 10
तर मनसे नेते राजू पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर संजय राऊत यांनीही अप्रत्यक्षपणे शिंदे-फडणवीस यांच्यातील संघर्षावर भाष्य केले. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. परंतु एक लक्षात घ्या, शेवटी महाराष्ट्राची सत्ता पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे. जर त्यांना हा निर्णय पटला नाही तर ज्या उदात्त हेतूने पाठिंब्याचे प्रकरण घडले आहे, त्यांच्या मागे फार मोठा ससेमिरा लागू शकतो असं सूचक विधानही राऊतांनी राजू पाटील यांच्याबाबत केले आहे.
9 / 10
उल्हासनगरमध्येही शिंदेसेनेकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या २ नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे. याठिकाणी भाजपाचे ३७ आणि शिंदेसेनेकडे ३७ नगरसेवक आहेत. इथं ४० ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिंदेसेनेची हालचाल सुरू आहे. त्यामुळे वंचित, अपक्षांच्या बळावर उल्हासनगरमध्येही शिंदेसेनेचा महापौर करण्यावर श्रीकांत शिंदे यांचा भर आहे.
10 / 10
अलीकडेच अंबरनाथ येथे नगरपरिषदेच्या सत्ताकारणातून भाजपा आणि शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर आला. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपद भाजपाकडे गेले. त्यानंतर सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी भाजपाने काँग्रेस नगरसेवकांची साथ घेत शिंदेसेनेला दूर ठेवले. त्यानंतर शिंदेसेनेनेही खेळी करत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवारांच्या सदस्याला निवडून आणले. श्रीकांत शिंदे यांच्या या डावपेचाने रवींद्र चव्हाणांना मोठा धक्का बसला. त्याशिवाय बदलापूरमध्येही सत्तांतर घडवून भाजपाने शिंदेसेनेला दूर केले आहे. त्यामुळे त्याचा वचपा घेण्याचं काम शिंदेसेनेकडून सुरू आहे.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे