कोणाला स्वप्नातही वाटले नसेल! ज्या SP ऑफिसबाहेर भाजी विकली, त्याच ऑफिसमध्ये DSP होऊन आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:57 IST2025-01-09T12:52:39+5:302025-01-09T12:57:47+5:30
कोणाला स्वप्नातही वाटले नसेल, पण त्याने भाजी विकता विकता जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण केले आहे.

मेहनतीचे फळ नेहमी चांगले असते तसेच कोणाला कधी कमी लेखायचे नसते. ही प्रेरणादायी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या एका आयपीएस अधिकाऱ्याची. या अधिकाऱ्याने ज्या एसपी ऑफिसबाहेर भाजी विकली त्याच ऑफिसमध्ये डीएसपी बनून येण्याची किमया साधली आहे. कोणाला स्वप्नातही वाटले नसेल, पण त्याने भाजी विकता विकता जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण केले आहे.
पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांच्या कठोर मेहनतीची ही गोष्ट आहे. या अधिकाऱ्याने फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या खासदाराच्या गाडीलाही सोडले नव्हते. दीड हजारांचा दंड भरायला लावला होता. बगाटे छत्रपती संभाजीनगरला पोस्टिंगवर आहेत.
बगाटे यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी कुटुंबाला मदत व्हावी म्हणून त्यांच्या मूळ गावच्या एसपी ऑफिसबाहेर भाजी विकण्यास सुरुवात केली होती. याचवेळी त्यांनी आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. परिस्थितीवर मात करत त्यांनी २०१६ मध्ये आयपीएस पदाला गवसनी घातली. परंतू हा प्रवास सोपा नव्हता.
तीन वेळा ते मुलाखतीच्या फेरीपर्यंत जाऊन आले होते. परंतू, परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. आधीपासूनच संकटांना तोंड देत असल्याने संकटांशी दोन हात करण्याचे सोडले नाही. अपयशातून शिकले आणि प्रयत्न करत राहिले. आज नितीन बगाटे यांची सफलतेची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या...
मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा: मूलभूत संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि एक मजबूत पाया तयार करा.
चालू घडामोडींवर लक्ष ठेवा: चांगली वर्तमानपत्रे नियमितपणे वाचा आणि देश आणि जगाच्या घडामोडींबद्दल अपडेट रहा.
समाज समजून घ्या: समाजाच्या समस्या आणि त्यांचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करा.