अनेकांना विनायक मेटेंची आठवण आली! एक वर्षात काय बदलले? की नुसती चर्चाच झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:24 PM2023-07-01T12:24:15+5:302023-07-01T12:33:16+5:30

Buldhana Bus Accident : गेल्या वर्षी पावसाळ्यात आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. यानंतर काही दिवसांनी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्याही कारला अपघात झाला होता. चर्चा झाली, पण पुढे काय झाले? एक वर्षात काय बदलले?

गेल्या वर्षी पावसाळ्यात, ऑगस्टमध्ये शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. यानंतर काही दिवसांनी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्याही कारला अपघात झाला होता. दोन्ही अपघातात मेटे आणि मिस्त्री यांचा मृत्यू झाला होता. आता या अपघातांना जवळपास १० महिने झाले आहेत. हे अपघात झालेले तेव्हा रस्ते सुरक्षा, वाहनांचा फिटनेस, चालकांचे प्रशिक्षण, हॉस्पिटर आदीवर चर्चा झाली, पण पुढे काय झाले? एक वर्षात काय बदलले? असा प्रश्न आजच्या समृद्धी महामार्गावरील बस अपघाताच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मेटे, मिस्त्रींचा अपघात झाला तेव्हा त्या अपघाताला ड्रायव्हरच जबाबदार असल्याचे समोर आले होते. दुसरी बाब म्हणजे मेटेंना वेळेवर मदत मिळाली नाही, हे देखील समोर आले होते. यावर जबाबदार नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया, सुधारणा करण्याची चर्चा केली होती. परंतू, आजही परिस्थिती जैसे थेच आहे.

नाही म्हणायला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर स्पीड सेन्सिंग कॅमेरे लागलेले आहेत. ते देखील दोन वर्षापासून आहेत. परंतू, कुठेही वाहनांची तपासणी केली जात नाही. ना वाहनांचे टायर तपासले जात, ना चालक नशेत आहे की शुद्धीत हे तपासले जात.

वाहन चालक फक्त सीटबेल्ट लावतो, ते पण पोलीस पकडतील आणि फाईन मारतील म्हणून. आतमध्ये बसलेले प्रवासी वाहनचालकाच्या जिवावर निर्धास्तपणे प्रवास करत असतात. गेल्या वर्षभरात ना हॉस्पिटल उभारले गेले नाही मदत करण्याची यंत्रणा सुधारण्यात आली.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासूनच मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या रस्त्यावर अत्यंत वेगात वाहने हाकली जात आहेत. तिथे जंगली प्राणी कुठेही, कधीही आडवे येत आहेत. आजच्या बस अपघातात वेळेवर मदत मिळाली नाही, यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचे बोलले जात आहे. मदतकार्यच सुरु झाले नाही, यामुळे बसमध्ये अडकलेल्या २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

वर्षभरापूर्वी मेटेंच्या अपघातावेळी देखील तेच झाले होते आजही तीच चूक झाली आहे. बस चालकानुसार टायर फुटल्याने अपघात झालाय तर महाजन आणि पोलिसांनुसार ड्रायव्हरला झोप लागल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे या तिन्ही अपघाताची कारणे तशी सारखीच आहेत, जी नेहमीच्या अपघातांची असतात.

टायर फुटला, चालकाला डुलकी लागली आणि रोड हिप्नॉटिझम ही तीन कारणे नेहमीच्याच अपघातांची असतात. याला सर्वात जबाबदार बाब म्हणजे अतिवेग. अतिवेग कमी करण्यासाठी वाहन चालक, मालकांनी याची काळजी घ्यायला हवी. कारण तुमच्या वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवणे हे तुमच्याच हातात आहे. सरकारला जेव्हा दिसणार तेव्हा ते कारवाई करणार.

समृद्धी महामार्गावर स्पीड सेंसिंग कॅमेरे, वैद्यकीय सुविधा, मदत पोहोचविण्याची यंत्रणा आदींचा अभाव असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मार्ट यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. परंतू त्याबरोबर ती बसविण्यास वेळ लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आपली काळजी आपणच घ्यावी लागणार आहे.

प्रवासाला निघण्यापूर्वी वाहन सुस्थितीत आहे का हे पहावे. टायर चांगल्या स्थितीत आहेत का? साध्या हवे ऐवजी नायट्रोजन भरावा, ब्रेक, लाईट नीट आहेत का ते पहावे. दर दोन अडीज तासांनी ड्रायव्हरने कार बाजुला थांबवून किंवा हॉटेल आदी ठिकाणी हॉल्ट घ्यावा. मोठ्या प्रवासाला जात असताना ऑईल चेंज, सर्व्हिसिंग आदी करून घ्यावे. वाहनात बसल्यानंतर सीटबेल्ट लावावा. महत्वाचे म्हणजे उजवीकडे, डावीकडे वळताना आणि लेन चेंज करताना इंडिकेटरला वापर करावा.

तुम्हाला स्वत:ला वेग नियंत्रणात ठेवता येत नसेल किवा भान राहत नसेल तर आता छोट्या गाड्यांमध्येही क्रूझ कंट्रोलचा पर्याय येतो. जर हायवेचा वेग ८० किमी असेल तर तो ७५ च्या आसपास सेट करावा. १०० असेल तर ९५ च्या आसपास सेट करावा. याने तुम्ही वेगमर्यादा देखील ओलांडत नाही आणि वेगही नियंत्रणात राहतो. वळण किंवा उतार आला, पुढे वाहन असेल तुम्हाला तो ब्रेक लावल्यावर बंदही करता येतो. तेवढे फक्त सावध रहावे.