By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:33 IST
1 / 10शरद पवारांच्या वाढदिवशी दिल्लीत घडलेल्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे पवारांच्या भेटीला पोहचले. या भेटीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसह इतर गोष्टींवर चर्चा झाली.2 / 10विधानसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. अजितदादांच्या नेतृत्वात ४१ आमदार निवडून आले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. त्यातच निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे नेते निकालानंतर पहिल्यांदाच भेटल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. नेमकं या भेटीत दडलंय काय, या भेटीत भाजपाची काय भूमिका असू शकते याचीही चर्चा आहे.3 / 10दिल्लीतील या घडामोडींपूर्वी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत काय घडलं याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. निकालानंतर काही दिवसांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी एक विधान केले. ते म्हणाले होते की, 'आपले भविष्य उज्ज्वल आहे. भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक व ताकद आहे. कोणी म्हणत असेल सरकार, आमदार आम्ही आहोत. मात्र, एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो. एक महिन्याच्या कालावधीतच एक गूड न्यूज कळेल या वक्तव्याने बरीच चर्चा झाली.4 / 10नुकतेच महाविकास आघाडीचे खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत अशी बातमी समोर आली. विशेषत: शरद पवार गटाचे आमदार भाजपाच्या वरिष्ठांशी संपर्क करतायेत या खुद्द भाजपा नेत्यांनीच दुजोरा दिला. लंकेचे विधान आणि त्यानंतर भाजपा नेत्यांची अशी वक्तव्ये ही एकप्रकारचे संकेतच आहेत का असा सवाल विचारला जाऊ लागला.5 / 10अजित पवार दिल्लीत आहेत. त्यांच्यासोबत पक्षातील अनेक वरिष्ठ नेतेही दिल्लीत आहेत आणि या सर्वांनी आज शरद पवारांची भेट घेतली. ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितले जात असले तरी यातून राजकीय संदेश बाहेर पडला जात आहे. निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांची नाराजी, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवारांनी दिलेला उघड पाठिंबा या पार्श्वभूमीवर दबावतंत्र म्हणूनही ही भेट आहे का हादेखील प्रश्न आहे.6 / 10अजित पवार-शरद पवार भेटीत काय दडलंय असं विचारलं गेले तर त्यामागे काही राजकीय कारणे दिसून येतात. त्यातील पहिले कारण म्हणजे केंद्रात मोदी सरकारकडे सध्या स्पष्ट बहुमत नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर एनडीए सरकार आले आहे. त्यात भविष्यातील राजकीय गणिते जुळवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ खासदार भाजपासोबत आले तर या दोघांपैकी एकाने साथ सोडली तरी सरकार मजबूत असल्याचं चित्र समोर येईल.7 / 10दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य, महायुती सरकार स्थापनेपूर्वी शिंदे यांची नाराजी माध्यमात चर्चेत होती. मुख्यमंत्रिपद नसेल तर गृहमंत्रिपद द्यावे असा त्यांच्या पक्षाचा आग्रह आहे. शिंदे यांचे ७ खासदार दिल्लीत निवडून आलेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना सहजपणे दुर्लक्ष करणे भाजपासाठी अवघड आहे. राज्यात अजित पवारांच्या साथीने भाजपा सरकार बनवू शकत असतानाही शिंदेंची मनधरणी करण्याचे भाजपाने प्रयत्न सुरूच ठेवले होते. 8 / 10येत्या भविष्य काळात केंद्रातील राजकारणात संख्याबळ पाहता भाजपाकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. त्यादृष्टीनेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले त्यात ८ खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. शिंदेची नाराजी, चंद्राबाबू, नितीश कुमार यांचं बेभरवशाचं राजकारण त्यातून भाजपा भविष्यातील तजवीज करून ठेवतंय अशी चर्चा आहे. 9 / 10निवडून आलेले प्रतिनिधी सांभाळता येत नाही हे महाविकास आघाडीचे अपयश आहे. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला भेटून सांगतात की आम्हाला कुणी विचारत नाही, आमचा पक्ष जनप्रितिनिधी म्हणून प्रोत्साहन देत नाही. विकासकामे करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे समर्थन करत नाही. त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अलीकडेच विधान केले आहे. 10 / 10दरम्यान, 'भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.