"शिवसेना आमचं घर, हे कष्टानं उभं केलंय; आदित्य आम्हाला बाहेर काढू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 12:51 PM2022-07-08T12:51:29+5:302022-07-08T12:57:04+5:30

मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात भूमिका घेत आम्ही बंड नाही तर उठाव केलाय असं ठणकावून विधानसभेत सांगितले. त्यानंतर आम्हीच शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून सातत्याने केला जात आहे.

आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी आमदारांवर केलेल्या टीकेला शिंदे गटातील आमदार रोखठोक उत्तर देताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे शिवसेनेत येण्यापूर्वी आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. गेली ३०-३५ वर्ष आम्ही कष्ट करून शिवसेना उभी केलीय, शिवसेना हे आमचं घर आहे अशा शब्दात आमदार शंभूराज देसाई यांनी सुनावलं आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, आमच्या घरातून आदित्य ठाकरे आम्हाला बाहेर काढू शकत नाहीत. १९८६ पासून शिवसेनेत आहे. त्याकाळी सातारा काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तिथे मी तीनवेळा निवडून आलोय. त्यामुळे आदित्य ठाकरे आम्हाला बाहेर काढणार असाल तर ते शक्य नाही.

आदित्य ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर, परंतु आमच्याशीही त्यांनी तशाच पद्धतीने बोलावं. आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन चाललो आहोत असंही शंभूराज देसाई म्हणाले.

शिवसेना आमचं घर आहे. या घरातून आम्हाला ढकलून बाहेर काढणं शक्य नाही. आम्हाला हाकलवून दिले तरी हे घर आमचे आहे. आम्ही शिवसेना कष्टाने उभी केली आहे. हे आदित्य ठाकरेंनी लक्षात ठेवावे असंही शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.

त्याचसोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आमच्यासोबत आहेत. संख्याबळ आमचं जास्त आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच आहे असा दावाही शंभूराज देसाई यांनी केला आहे.

त्यातच आता उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांना वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा असं म्हटल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आपल्या हातातून जाऊन द्यायची नाही यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु उद्धव ठाकरे द्विधामनस्थितीत आहेत असं देसाईंनी सांगितले.

दरम्यान, पुढील विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात फिरणार आहे. २०२४ मध्ये शिंदे गटाचे १०० आणि भाजपाचे १०० आमदार निवडून आणणार असा दावाही शंभूराज देसाई यांनी केला आहे.