लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, पण मार्चचा कधी मिळणार?; महिलांमध्ये साशंकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:22 IST2025-03-14T17:19:49+5:302025-03-14T18:22:59+5:30

इतर योजनांमधून लाभ घेतला जात असेल तर अथवा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेतून नावे वगळली जाणार आहेत.

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने १,५०० रुपयांची भेट दिली असून, राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

बहुतांश महिलांच्या खात्यात ही रक्कम जमाही झालेली आहे. मात्र, दुसरीकडे मार्च महिन्याची रक्कम कधी जमा होणार, हे अधिकाऱ्यांनाही खात्रीशीर सांगता येत नाही.

महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. फक्त १,५०० मिळतील की २,१००, याबाबत साशंकता होती. अखेर महिला दिनाचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करण्यास सुरुवात झाल्याने बहिणींनाही दिलासा मिळाला आहे.

इतर योजनांमधून लाभ घेतला जात असेल तर अथवा जास्त उत्पन्न असेल तर त्यातून नावे वगळली जाणार आहेत. मात्र, अंगणवाडी सेविकांनी सर्व्हे करण्यास नकार दिल्याने त्यापुढे प्रश्न निर्माण झाले आहेत.

या महिलांनी नाकारला लाभ- निवडणूक पूर्वकाळात दिवाळीच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना कोट्यवधी रुपये दिल्याने सरकारी तिजोरीवर ताण आल्याचा दावा विरोधकांनी केला होता.

दोन महिन्यांपासून खात्यावर पैसे जमा होत नसल्याने योजनेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच अनेक बहिणींच्या मदतीला कात्री लागणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, कोणत्या बहिणींना यातून वगळायचे, यासाठी सर्व्हेच झाला नसल्याने काही महिलांचीच नावे त्यातून वगळण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

नावावर कार असेल तर लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वेक्षण झाल्यानंतर या बहिणी त्यातून बाहेर पडतील.

मार्चचा हप्ता केव्हा ? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाला जमा झाला. मात्र, त्यानंतरचा हप्ता कधी जमा होईल, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अथवा सूचना नाही. त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता याच महिन्यात मिळेल की पुढच्या महिन्यात, याबाबत साशंकता आहे.

आधार लिंक अपडेट- याआधीच लाभार्थी महिलांचे आधार लिंक असल्याने आधार लिंक नाही म्हणून खात्यात पैसे जमा नाही, अशी परिस्थिती आता नाही.

आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही सूट- ज्या महिला आपल्या उत्पन्नाचे विवरणपत्र भरत असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्यांची नावेही यातून कमी होणार आहेत. ज्यांच्या नावावर चारचाकी गाडी असेल त्यांचेही नावे चौकशी झाल्यावर कमी होणार असल्याची माहिती आहे.