शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:13 IST

1 / 10
विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवत असून ही योजना कधी बंद होणार नाही असा दावा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकताच केला. मात्र लाडकी बहीण योजनेतील छाननी प्रक्रियेत दिवसेंदिवस लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
2 / 10
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे आणि युक्त्या वापरून कुटुंबातील तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
3 / 10
आता या प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. अशा लाभार्थी महिलांच्या नावापुढे 'एफएससी मल्टिपल इन फॅमिली' असा शेरा मारून त्यांचे अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या महिलांना मिळणारा लाभ बंद होणार असून लाभार्थींमध्ये खळबळ उडाली आहे.
4 / 10
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्यावेळी अनेक अर्ज फारसे निकष न तपासता मंजूर केले गेले. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडत आहे.
5 / 10
सध्या प्रशासनाकडून योजनेच्या लाभार्थींची यादी युद्धपातळीवर तपासली जात आहे. या तपासणीत अनेक बोगस अर्ज समोर आले असून शासनाचा हा कठोर निर्णय खऱ्या आणि गरजू महिलांनाच लाभ मिळावा या उद्देशाने घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयामुळे अनेक महिलांना झटका बसला असून आता त्या योजनेतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
6 / 10
दुहेरी योजनेचा लाभ नाही - संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी सन्मान योजना यांचा लाभ घेत असतानाही काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज केले. हे अर्ज आधीच रद्द करण्यात आल्याने दुहेरी योजनेचा लाभ आधीच बंद झाला आहे. त्यात आता आणखी संख्या घटणार आहे.
7 / 10
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार, काही विशिष्ट प्रकारच्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये एकाच घरात दोनपेक्षा अधिक महिला असणे, कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणी आणि शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना १५०० रुपये मदत बंद केली जात आहे.
8 / 10
लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती आणि सप्टेंबर महिन्यापासून नवीन नोंदणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यात योजनेचा लाभ सोडणाऱ्या महिलांचीही संख्या वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात ६७७ महिलांनी या योजनेचा लाभ स्वत:हून सोडला आहे.
9 / 10
निकषांचे कठोर पालन - राज्यात लाडकी बहीण योजनेतील गोंधळ समोर आल्यानंतर आता निकषांचे काटेकोर पालन केले जात आहे. या योजनेतील अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे, तिचे वय २१ ते ६५ वर्षादरम्यान असणे आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे.
10 / 10
लाडकी बहीण योजनेसाठी विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलादेखील या योजनेसाठी पात्र आहेत. परंतु योजनेतील पडताळणीमुळे अनेक प्रकार समोर आल्याने या योजनेवर विरोधकांकडून केली जात आहे.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती