लाडक्या बहिणींनो निश्चिंत राहा! आदिती तटकरेंकडून खुशखबर; मार्चच्या हप्त्याबाबत कोणती घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 00:14 IST2025-03-09T00:03:35+5:302025-03-09T00:14:01+5:30

Ladki bahin yojana: महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना फेब्रवारी व मार्च या दोन महिन्यांचा एकत्र दिला जाणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे, असं तटकरे यांनी सांगितलं आहे.

ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याच्या २४ तारखेलाच १५०० रुपयांचा हप्ता बँक खात्यावर जमा होत असतात.

मंत्रालयस्तरावरून धनवान, चारचाकी असलेल्या, इन्कमटॅक्स भरणाऱ्या महिला लाभार्थ्यांची नावे कमी करण्याचे काम जवळपास एक महिन्यापासून सुरू आहे.

लाडकी बहीण योजनेचा राज्य शासनाच्या तिजोरीवर भार होत असल्याने ही योजना बंद न करता गोरगरीब नसणाऱ्या महिलांना वगळण्याचे काम केले जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना तत्कालीन महायुती सरकारने जाहीर केली होती. निवडणुकीच्या अनुषंगाने ही योजना जाहीर करून अर्ज केलेल्या सरसकट महिलांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्याता आला.

एकाच वेळी दोन महिन्यांचा हप्ता ही दिला गेला. परंतु आता त्यावेळी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून अपात्र महिला निश्चित केल्या जात आहे.

लाभार्थी कमी होणार- संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील महिला लाभार्थ्यांनाही वगळण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांची नावे कमी होणार आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे.